तीव्र उतारावरील तब्बल १२०० घरांवर वनविभाग फिरवणार बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:39 AM2021-07-31T04:39:48+5:302021-07-31T04:39:48+5:30
ठाणे : घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता घोलाईनगरसह पारसिक, इंदिरानगर, आतकोनेश्वरनगर, ...
ठाणे : घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता घोलाईनगरसह पारसिक, इंदिरानगर, आतकोनेश्वरनगर, भास्करनगर, पौंडपाडा, कारगिल खोंडा आदींसह इतर भागातील डोंगराच्या अतितीव्र उतारावर असलेल्या तब्बल १२०० अतिक्रमणांवर आता वनविभाग बुलडोजर फिरविणार आहे. वनविभागाने केलेल्या सर्व्हेत अतिक्रमणांची यादी पुढे आली आहे. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ही कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.
कळव्यातील घोलाईनगर भागात १९ जुलै रोजी झालेल्या पावसात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर डोंगरावरील बांधकामांची समस्या पुढे आली. या घटनेनंतर वनविभागावर टीका झाल्यानंतर त्यांनी मागील काही दिवसांपासून डोगंरावरील तीव्र उतारांवरील अतिक्रमणांचा सर्व्हे सुरू केला होता. आता त्याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार डोंगराच्या तीव्र उतारावर तब्बल १२०० अतिक्रमण असल्याची माहिती समोर आली आहे. आतकोनेश्वरनगर, भास्करनगर, इंदिरानगर, घोलाईनगर, पौंडपाडा, वाघोबानगर आणि कारगिल खोंड या भागात हा सर्व्हे करण्यात आला होता. या अहवालानुसार या ठिकाणच्या अतिक्रमणांना घरपट्टी केव्हा लावली गेली, पाणी केव्हा दिले गेले, वीज केव्हा दिली गेली याची माहिती वनविभागाकडून गोळा केली जात आहे. त्यातील किती अतिक्रमणे जुनी आणि नवीन आहेत, याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्याअनुषंगाने महापालिका आणि महावितरणला पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.
वनविभागाच्या माध्यमातून आता या डोंगरावरील तीव्र उतारावरील अतिक्रमणांवर कारवाई करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानुसार येथील बांधकामधारकांकडून सोमवारपासून माहिती मागविली जाणार असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अतिक्रमण हटवून संरक्षक भिंत बांधणार
वनविभाग तीव्र उतारावरील १२०० बांधकामे ऑगस्ट महिन्यात हटविणार आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर अशा घटना टाळण्यासाठी किंबहुना अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी या भागात ८ कोटींचा निधी खर्च करून संरक्षक भिंत बांधली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
............
मागील काही दिवसापासून वनविभागाकडून डोंगराच्या तीव्र उतारावरील अतिक्रमणांचा सर्व्हे सुरू होता. त्याचा अहवाल तयार झाला असून याठिकाणची १२०० अतिक्रमणे आता हटविली जाणार आहे. त्यानंतर येथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे.
(नरेंद्र मुठे - वनक्षेत्र अधिकारी, ठाणे)