रस्त्यावरील कामाला वन खात्याचा विरोध
By admin | Published: October 10, 2016 03:40 AM2016-10-10T03:40:12+5:302016-10-10T03:40:12+5:30
नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. सात किलोमीटर लांबीचा रस्ता ज्या भागातून जात आहे, त्याच्या आजूबाजूला वन क्षेत्र
कांता हाबळे /नेरळ
नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. सात किलोमीटर लांबीचा रस्ता ज्या भागातून जात आहे, त्याच्या आजूबाजूला वन क्षेत्र आहे. त्यामुळे कर्जत वन विभागाने रस्त्यासाठी बांधण्यात येत असलेल्या गटारांचे काम करण्यास हरकत घेतली आहे. याच घाट रस्त्यातील सहा किलोमीटर भागात माथेरान वन विभागाने रस्त्याचे काम करण्यास परवानगी दिली आहे, मग कर्जत वन विभागाची भूमिका एवढी कठोर का? असा प्रश्न नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेने उपस्थित केला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने नेरळ हुतात्मा चौक ते माथेरान दस्तुरीनाका या कामासाठी २७ कोटींचा निधी दिला आहे. गेल्या चार महिन्यांपासून घाट रस्त्यात संरक्षण भिंती आणि गटारे बांधण्याचे काम सुरू आहे. या घाट रस्त्यातील जुम्मापट्टी स्टेशन ते घाट सुरू होईपर्यंत असलेल्या भागातील क्षेत्र कर्जत वन विभागाच्या अखत्यारीत आणि उर्वरित क्षेत्र माथेरान-नेरळ वनक्षेत्रपाल यांच्या अखत्यारीत आहे. सध्या आरसीसी पद्धतीची गटारे बांधण्याचे काम एमएमआरडीएने नेमलेला ठेकेदार करीत असून जुम्मापट्टीपर्यंत डोंगराच्या कडेला रस्त्यालगत गटारे बांधून पूर्ण झाली आहेत. तर जुम्मापट्टी धबधबा परिसरात देखील गटारे बांधण्याचे काम सुरु आहेत. नेरळ ते जुम्मापट्टी भागातील संरक्षण भिंतीची कामे पूर्ण होत असून ही कामे चार महिन्यांपासून सुरू आहेत. दीड वर्षात रस्त्याचे रु ंदीकरण आणि डांबरीकरण करून रस्ता सुरक्षित वाहतुकीसाठी पूर्ण करून देण्याची जबाबदारी प्राधिकरणाने ठेकेदारावर टाकली आहे. उन्हाळ्यात आधीच खराब झालेल्या रस्त्याची अवस्था पावसाळ्यातील चार महिन्यांत वाहतूक करण्यायोग्य राहिली नाही. मोठा अपघात होण्याच्या स्थितीत असलेल्या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे, अशी माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वांची अपेक्षा आहे.
नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या आजूबाजूला वन विभागाचे क्षेत्र आहे. माथेरान-नेरळ वन विभागाने जनतेची सोय व्हावी म्हणून रस्त्याच्या कामाला सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र कर्जत वन विभागात नव्याने रु जू झालेले वनक्षेत्रपाल अनिल लांडगे यांनी जुम्मापट्टी स्टेशन ते मुख्य घाट या एक किलोमीटर भागातील रस्त्याच्या कामाला विरोध केला आहे. वन विभागाचे एक कार्यालय गेली अनेक महिने घाट रस्त्याचे काम होत असताना विरोध करीत नाहीत आणि त्याच विभागाचे दुसरे कार्यालय कामे थांबवून ठेवत आहे. कर्जत वन विभागाची ही भूमिका विकासाला विरोध करणारी असल्याचे मत नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेने व्यक्त केले आहे. ४०० कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न या टॅक्सी व्यवसायावर अवलंबून असून वन विभागाने रस्त्याचे काम अडवून विकास प्रक्रि येस खो घातला आहे, त्यामुळे काम रखडले आहे. कामे रखडल्यास पूर्णपणे नादुरु स्त झालेला रस्ता पाहता वाहतूक बंद करावी लागेल अशी भीती व्यक्त होत आहे.