सत्तेसाठी मुंडेंच्या संघर्षाचा विसर

By admin | Published: August 20, 2016 04:45 AM2016-08-20T04:45:19+5:302016-08-20T04:45:19+5:30

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी २५ वर्षांपूर्वी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध एल्गार पुकारून शरद पवार यांना लक्ष्य केले होते तेव्हा उल्हासनगरचे वादग्रस्त नेते

Forget about Munda's struggle for power | सत्तेसाठी मुंडेंच्या संघर्षाचा विसर

सत्तेसाठी मुंडेंच्या संघर्षाचा विसर

Next

ठाणे : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी २५ वर्षांपूर्वी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध एल्गार पुकारून शरद पवार यांना लक्ष्य केले होते तेव्हा उल्हासनगरचे वादग्रस्त नेते पप्पू कालानी हे त्यांच्या रडारवर होते. सध्या पप्पू हे तुरुंगात असून त्यांचे पुत्र ओमी यांच्याकरिता लाल गालिचे अंथरण्याची लगबग ठाणे जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी सुरू केली आहे. सत्तापिपासू भाजपाला मुंडे यांच्या संघर्षाचा अल्पावधीत विसर पडल्याबद्दल त्यांचे समर्थक तीव्र नापसंती व्यक्त करीत आहेत.
पप्पू कालानी हे पवारसमर्थक म्हणून ओळखले जात. उल्हासनगरच्या रक्तरंजीत राजकारणाचा मुद्दा मुंडे यांनी उचलला होता. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी मुंडे यांच्या संघर्षाला साथ देत ‘कालानी यांना तुरुंगात मारहाण करु नका,’ असे आदेश पवार यांनी दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. मुंडेंच्या संघर्षामुळे १९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार सत्तारूढ झाले.
इंदर भतिजा हत्याकांडात पप्पू सध्या तुरुंगात आहे.
भाजपाने विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यशैली अमलात आणली आहे. ज्या शहरात पक्ष कमकुवत असेल तेथील मातब्बर नेत्याला पक्षात घेऊन तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेवर कब्जा मिळवण्याची ही रणनीती आहे. मातब्बर नेत्याला पक्षप्रवेश देताना त्याच्या भ्रष्ट, गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे कानाडोळा करून ‘बेरजेचे राजकारण’ या गोंडस नावाखाली त्या नेत्याला पावन केले जाते. राष्ट्रवादीकडे गृहखाते असल्याने अनेक माफिया सत्तेच्या काळात त्या पक्षाच्या वळचणीला गेले होते. सत्ताबदल होताच त्यांना भाजपाची आस लागली असून त्याचे कारण गृहखाते हेच आहे. राष्ट्रवादीने दिवंगत आर. आर. पाटील यांचा सोज्वळ चेहरा गृहखात्याला दिला होता. सध्या गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून तेही त्यांच्या स्वच्छ प्रतिमेकरिता सुपरिचीत आहेत. (संबंधित वृत्त पान ४)

सत्तापिपासू झाल्याने अटलबंधनाची घाई

कालानी भाजपात डेरेदाखल व्हावे याकरिता राज्य मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे प्रयत्न करीत आहेत. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महेश शुक्रमणी यांचा भाचा गुड्डु शुक्रमणी यांना ओमी कालानी यांनी यापूर्वी मारहाण केली होती व त्याकरिता ते तरुंगात होते.
त्यावेळी कालानी यांच्या अटकेकरिता भाजपा-शिवसेना या मित्रपक्षांनी संयुक्त मोर्चे काढले होते. मात्र आता उल्हासनगरमधील येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची सद्दी संपवणे हा एकमेव हेतू असल्याने कालानी यांना ‘अटलबंधन’ बांधण्याची घाई सुरु झाली असल्याने मुंडे यांनी केलेल्या संघर्षावर बोळा फिरवला जाणार आहे, असे मुंडे समर्थकांचे मत आहे.

Web Title: Forget about Munda's struggle for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.