अर्थसंकल्पात शाई धरणाचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:20 AM2019-02-21T05:20:05+5:302019-02-21T05:20:39+5:30
ठाणेकर तहानलेलेच : लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाची अनास्था
ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात ३० टक्के पाणीटंचाई असताना आणि नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरातील अनेक गृहसंकुलांनी पाणीटँकरचा आधार घेतलेला असतानाही यंदाच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी विविध योजनांच्या ऊहापोहाशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रस्तावित शाई धरणाविषयी काहीच उल्लेख नाही. यामुळे महापालिकेने शाई धरणाच्या कामातून काढता पाय घेतला की काय, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
भविष्यातील ठाणेकरांची तहान भागावी, या उद्देशाने महापालिकेने मोठ्या प्रयत्नानंतर शाई धरणाचा प्रकल्प खेचून आणला होता. किंबहुना, त्याला मंजुरी मिळवून २००७ मध्ये जलसंपदा विभागाला शाई धरणासाठीचे सर्वेक्षण आणि खर्चाचा आराखडा करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार, याचा सर्व्हेदेखील पूर्ण झाला असून ४५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला. परंतु, लोकप्रतिनिधींनी अनास्था दाखवून हे धरण उभारण्याची क्षमता नसल्याचे कारण पुढे करून त्याचे काम एमएमआरडीएने करावे, असे सूचित करून त्यातून मिळणारे पाणी ठाण्याबरोबरच इतर महापालिकांना द्यावे, असे सुचवले. यामुळे तीव्र पाणीटंचाईला तोंड
द्यावे लागत असल्याने ठाणेकर त्रस्त झाले आहेत.
खर्च १४०० कोटींवर : ठाणेकरांना हक्काचे धरण मिळाले असते, तर २०४६ पर्यंतची तहान ठाणेकरांची यामुळे भागू शकली असती. दरम्यान, या धरणाचा खर्च ४५० कोटींवरून १४०० कोटींच्या आसपास गेला आहे, त्यामुळे आता तो पालिकेच्या डोक्यावरून जाणार आहे. विशेष म्हणजे हे धरण झाले असते, तर इतर स्रोतांकडून पाण्यासाठी केला जाणारा खर्च हा ५० टक्कयांवर आला असता आणि ठाणेकरांना त्याच पैशांतून हक्काचे धरणही मिळाले असते. परंतु, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या अनास्थेने यंदाच्या अर्थसंकल्पात त्याचा विसर पडल्याचे दिसत आहे.