मीरा-भाईंदरमध्ये एक सदस्यीय प्रभागपद्धतीमुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:43+5:302021-08-28T04:44:43+5:30

मीरारोड : निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागपद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्याने एका प्रभागात चार नगरसेवक या बहुसदस्य प्रभागपद्धतीला ...

Formation of aspirants due to one member ward system in Mira Bhayandar | मीरा-भाईंदरमध्ये एक सदस्यीय प्रभागपद्धतीमुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी

मीरा-भाईंदरमध्ये एक सदस्यीय प्रभागपद्धतीमुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी

Next

मीरारोड : निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागपद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्याने एका प्रभागात चार नगरसेवक या बहुसदस्य प्रभागपद्धतीला त्रासलेल्या अनेक नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी तर त्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु प्रभाग रचना २०११ च्या जनगणनेनुसार होणार असल्याने नगरसेवकांची संख्या ९५ इतकीच राहणार आहे.

मागील भाजप-शिवसेना युती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एका प्रभागात चार नगरसेवक अशी बहुसदस्य प्रभाग पद्धत अमलात आणली. २०१७ च्या निवडणुकीत भाजपला त्याचा मोठा फायदा झाला होता. परंतु, शिवसेना व काँग्रेसला मात्र तोटा सहन करावा लागला होता. भाजपचे ६१, शिवसेनेचे २२, तर काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले होते.

निवडून आल्यानंतर एका प्रभागात चार नगरसेवक झाल्याने त्यांची आपसात भांडणे, वाद, मतभेद, हेवेदावे असे प्रकार चर्चेत आले. कामकाजात सुद्धा अडथळे होऊ लागले. लोकांमध्ये पण चार-चार नगरसेवक असूनसुद्धा समस्या सुटत नाहीत, असा सूर वाढला.

आता निवडणूक आयोगाने एक सदस्य पद्धतीने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिल्याने बहुतांश नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये उत्साह आहे. प्रभाग लहान होऊन स्वतःसाठीच मोर्चेबांधणी करायची असल्याने जो तो स्वतःकरिता सुरक्षित परिसर चाचपडू लागला आहे. यातून उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच होणार आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करताना नैसर्गिक हद्दी, प्रमुख रस्ते, चौक आदी विचारात घेतले गेले पाहिजेत. परंतु, राजकीय दबावाखाली वजनदार नेत्यांच्या फायद्यानुसार प्रभाग रचना चुकीची केली जात असल्याच्या तक्रारी मागील निवडणुकीत झाल्या होत्या. त्यामुळे यंदा प्रभाग रचना करताना प्रशासन दबाव किंवा विशिष्ट नेत्यांच्या लाभास बळी पडतात, हे लवकरच दिसून येईल.

Web Title: Formation of aspirants due to one member ward system in Mira Bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.