ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदासाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:30+5:302021-05-12T04:41:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे ...

Formation of Thane Crime Branch Unit One and Anti-Ransom Squad | ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदासाठी मोर्चेबांधणी

ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदासाठी मोर्चेबांधणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे नितीन ठाकरे यांच्या बदलीनंतर याठिकाणी कोणाची वर्णी लागणार याकडे आता अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. गुन्हे अन्वेषण विभागासह स्थानिक पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही या दोन जागांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाला एक वेगळे वलय निर्माण झाले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याला करोडो रुपयांच्या (चार फ्लॅट आणि ३० लाख रुपयांच्या) खंडणीप्रकरणी शर्मा, तसेच कोथमिरे यांच्या पथकाने १९ सप्टेंबर २०१७ रोजी अटक केली. अशा अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल केल्यानंतर २३ ऑगस्ट २०१७ रोजी खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदी आलेल्या शर्मा यांनी ४ जुलै २०१९ रोजी राजकारणात जाण्यासाठी राजीनामा दिला. त्यानंतर या पथकाची सूत्रे कोथमिरे यांच्याकडे आली. कोथमिरे यांनीही अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल केली. कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याचा ५० लाखांच्या खंडणी प्रकरणात ८ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबईतून ताबा घेतला.

२५ जून २०१६ रोजी खंडणीविरोधी पथकात आलेल्या कोथमिरे यांची अलीकडेच ठाण्यातून बदली झाली होती; परंतु पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती मिळविण्यात ते यशस्वी झाले होते. आता मात्र त्यांची थेट गडचिरोली येथे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे वाचक (रीडर) म्हणून बदली झाली आहे. त्यांच्यापाठोपाठ युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचीही ठाण्यातील कामगिरी चमकदार राहिली. जून २०१५ मध्ये मुंबईतून ठाण्यात ते आले होते. अगदी अलीकडे राबोडीत झालेल्या मनसेचे जमील शेख खून प्रकरणातही त्यांनी इरफान शेख आणि शाहीद शेख या दोघांना अटक केली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयातून एक दिवसीय मुलाचे अपहरण झाले होते. या प्रकरणात एका महिलेसह तिघांना त्यांनी अटक केली होती. दिवा येथील एका खुनातील आरोपीला ३० वर्षांनी त्यांच्या पथकाने अटक केली. अशा अनेक गुन्ह्यांची त्यांच्या पथकाने उकल केली. आता ठाकरे यांचीही बदली नंदुरबार येथे जात पडताळणी विभागात झाली आहे. दोन वर्षांपूर्वीच ठाकरे यांचा कार्यकाळ संपला होता. तरीही या बदलीबद्दलही तर्कवितर्क केले जात आहेत.

Web Title: Formation of Thane Crime Branch Unit One and Anti-Ransom Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.