सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांची व्यूहरचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:45 AM2019-11-28T00:45:00+5:302019-11-28T00:45:01+5:30
सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी तसेच त्या उघड करण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी अलीकडेच झालेल्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये दिले होते. याच पार्श्वभूमीवर आता ठाणे ग्रामीण पोलिसांनी सोनसाखळी चोरटयांना पकडण्यासाठी मोक्यांच्या ठिकाणांवर व्यूहरचना केली आहे.
जितेंद्र कालेकर
ठाणे : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने चोरणाऱ्यांना पकडण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभर व्यूहरचना केली आहे. मीरा रोड आणि भाईंदर या परिसरात सोनसाखळी चोरीचे प्रमाण अधिक असल्याने या भागात गस्तीचे प्रमाण वाढविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोनसाखळी चो-या रोखण्यासाठी तसेच त्या उघड करण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी अलीकडेच झालेल्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये दिले होते. या बैठकीमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये पालघर आणि ठाणे ग्रामीण भागात झालेल्या सोनसाखळीच्या जबरी चोºया तसेच खुनाच्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला होता.
याच पार्श्वभूमीवर गणेशपुरी, शहापूर, मुरबाड, भाईंदर आणि मीरा रोड या पाच विभागांतील १७ पोलीस ठाण्यांमधील गुन्ह्यांचाही आढावा ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनीही नुकताच घेतला. त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर सोनसाखळी चोरट्यांना पकडण्यासाठी ही व्यूहरचना केली आहे. यानुसार, शहापूर आणि मुरबाड विभागासाठी पोलीस उपनिरीक्षक सुळे आणि पाच कर्मचारी यांचे एक पथक तसेच भाईंदर विभागात पोलीस उपनिरीक्षक चेतन पाटील आणि पाच कर्मचारी यांचे एक पथक तर मीरा रोड विभागात सहायक पोलीस निरीक्षक विलास कुटे यांचे एक पथक तैनात केले आहे.
* साध्या वेशातील पोलिसांची गस्त
सोनसाखळी जबरी चोरी होणारी मोक्याची ठिकाणे आणि वेळा लक्षात घेऊन त्यादृष्टीने त्यात्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही यासाठी कार्यरत ठेवण्यात आले आहे.
* रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही यादी तयार
ठाणे ग्रामीणच्या सीमेवर असलेल्या ठाणे शहर, पालघर आणि मुंबई शहर या परिसरात वारंवार सोनसाखळी जबरी चोरी करताना पकडलेल्या कुख्यात आरोपींचीही यादी तयार केली आहे. त्या यादीनुसारही सीसीटीव्ही तसेच खब-यांच्या मदतीने या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. याशिवाय, व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारेही संशयितांची माहिती ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहर पोलिसांमध्ये वितरित केली जात आहे. त्याआधारेही गुन्हेगारांना पकडण्याची व्यूहरचना केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे ग्रामीणमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये सोनसाखळी जबरी चोरीचे ६९ गुन्हे दाखल झाले. त्यातील ३० गुन्हे उघडकीस आले असून २९ गुन्ह्यांचा तपास अद्याप प्रलंबित आहे. या सर्वच गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत.