माजी शहरप्रमुखाची शेतकऱ्याला दमदाटी
By admin | Published: January 24, 2017 05:36 AM2017-01-24T05:36:35+5:302017-01-24T05:36:35+5:30
उत्तन-गोराई वेशीवर असलेल्या सावंतवाडी गावातील सावंत या शेतकरी कुटुंबाने शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांना विकण्यासाठी काही दिवसांपूर्वी
राजू काळे / भार्इंदर
उत्तन-गोराई वेशीवर असलेल्या सावंतवाडी गावातील सावंत या शेतकरी कुटुंबाने शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांना विकण्यासाठी काही दिवसांपूर्वी पश्चिमेच्या भाजीबाजारात आणला होता. त्याला शिवसेनेचे माजी शहरप्रमुख गजेंद्र रकवी यांनी विरोध केला. यामुळे निर्माण झालेला वाद भार्इंदर पोलिसांत गेला. तेथे दोन्ही बाजूकडील व्यक्तींवर अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. यामागे रकवीच असल्याचा आरोप नौटियाल यांनी केला. आता त्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी भाजीविक्री बंद केली.
सावंत कुटुंबाने आपल्या पडीक जमिनीवर भार्इंदर येथील रहिवासी अनिल नौटियाल यांच्या सहकार्याने पुन्हा भाजीपाल्याची लागवड सुरू केली. शेतात चांगल्या दर्जाचा भाजीपाला पिकल्याने अनिल यांनी भार्इंदर येथील भाजीपाला विक्रेत्यांना शेतातील भाजीपाल्याची घाऊक विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांनी भार्इंदर पश्चिमेकडील पोलीस ठाण्यालगत असलेल्या काही परप्रांतीय भाजीविक्रेत्यांना सावंत यांच्या शेतात नेले. विक्रेत्यांनी सध्या भाजीचे उत्पादन अधिक झाल्याने भाजीपाल्याचा दर कमी झाल्याचा दावा करीत भाजीच्या प्रतिजुडी वा नगामागे १ रुपयाप्रमाणे दर देण्यास संमती दर्शवली. हा दर अत्यल्प असून त्यातून शेतीचा खर्चही भागणार नसल्याने नौटियाल व सावंत यांनी स्वत:च थेट ग्राहकांना भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. दि. ११ जानेवारीला त्यांनी शेतातील ताजा भाजीपाला थेट भार्इंदर पश्चिमेकडील बाजारात विकण्यास सुरुवात केली. ग्राहकांना ताजा भाजीपाला अन्य विक्रेत्यांकडील भाजीपाल्यापेक्षा स्वस्त दरात मिळू लागल्याने त्यांना मोठ्याप्रमाणात ग्राहक मिळू लागले. राज्य सरकारच्या ‘सावतामाळी योजनेंतर्गत’ सावंत यांच्या भाजीपाला थेट ग्राहकांना विकण्याच्या संकल्पाची प्रसिद्धिमाध्यमांनी दखल घेतली. सुरुवातीला भाजीपालाविक्रीची हातगाडी लावण्यास काहींनी विरोध केला. सावंत यांनी सिराज अहमद हसनअली सिद्दीकी या स्थानिकाच्या मदतीने येथील शिवसेना शाखेजवळ भाजीविक्रीला सुरुवात केली. त्याला सेनेचे माजी शहरप्रमुख रकवी यांनी विरोध करून हातगाडी कोणाला विचारून लावली, असा सवाल केला. त्यावर, अनिल यांनी आपण शेतकऱ्याचा भाजीपाला थेट ग्राहकांना स्वस्त दरात विकत असल्याने त्याला सहकार्य करण्याची विनंती रकवी यांना केली. मात्र, शाखेसमोर उत्तन परिसरातील भाजीविक्रेत्या महिलांनी सिद्दीकी याला धक्काबुक्की करून सावंत यांचा भाजीपाला फेकून दिला.