मेहता गटाचा विरोध डावलून फडणवीसांनी केले भाजपाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 07:14 PM2021-02-06T19:14:07+5:302021-02-06T19:14:15+5:30
भाईंदर पश्चिमेस उड्डाण पुलाजवळ नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी पक्षाचे जिल्हा कार्यालय सुरु केले आहे .
मीरारोड - भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या ७११ कंपनीच्या जागेतील भाजपाचे जिल्हा कार्यालय बंद करून भाईंदर पश्चिम येथे नवे जिल्हा कार्यालय सुरु करण्यात आले . विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीच नवीन कार्यालयाचे उदघाटन करून मेहता समर्थकांच्या विरोधाला जुमानले नाही असे मानले जात आहे .
भाईंदर पश्चिमेस उड्डाण पुलाजवळ नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी पक्षाचे जिल्हा कार्यालय सुरु केले आहे . त्याचे उदघाटन शुक्रवारी रात्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी महापौर ज्योत्सना हसनाळे, आमदार रवींद्र चव्हाण , निरंजन डावखरे , मिहीर कोटेचा , मुंबई पालिका गटनेते विनोद मिश्रा सह पालिकेतील पदाधिकारी , नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते .
फडणवीस म्हणाले कि , पूर्वीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व आताचे जे . पी . नड्डा यांनी प्रत्येक जिल्हा स्तरावर पक्षाचे स्वतःचे कार्यालय हवे असा निर्णय घेण्यात आला. जागा खरेदी करा व बांधकाम करा किंवा भाड्याने तरी घ्या पण पक्षाचे कार्यालय हवे . मीरा भाईंदर मध्ये जो पर्यंत स्वतःची जमीन घेऊन कार्यालय बांधता येत नाही तो पर्यंत स्वतःचे भाड्याने तरी कार्यालय सुरु करा असा निर्णय घेण्यात आला आणि हे कार्यालय भव्य व चांगले आहे . पण स्वतःच्या मालकीचे कार्यालय लवकर करा . कार्यालयात बसणारे लोक किती लोकाभिमुख आहेत . ते किती संवेदनशील आहेत या आधारावर राजकीय पक्षाच्या कार्यालयाचे मूल्यमापन होते.
वास्तविक सेव्हन स्क्वेअर शाळे जवळील मेहतांच्या ७११ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जागेत भाजपाचे कार्यालय चालवले जात होते . परंतु इतक्या वर्षात मेहतांनी शहर व पालिकेतील भाजपाची सर्व सूत्रे हाती ठेवत पदे उपभोगताना पक्षाचे मालकीचे कार्यालय मात्र करून दिले नव्हते यावर टीका होत होती .
जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी ७११ मधील जिल्हा कार्यालय नवीन जागेत सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने मेहतांसह अनेक नगरसेवक , पदाधिकारी आदींनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन म्हात्रेंना हटवण्या पासून नवीन कार्यालयास विरोध केला होता . परंतु चव्हाण यांनी पक्षाचा निर्णय असल्याचे स्पष्ट केल्याने सर्व रिकाम्या हाताने परतले होते . नवीन कार्यालयाचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार हे निश्चित असल्याने मेहता समर्थकांनी देखील उदघाटनास हजेरी लावली .