'क्रेन कोसळून कामगारांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक अन् दुर्दैवी'; उद्धव ठाकरेंचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 04:16 PM2023-08-01T16:16:53+5:302023-08-01T16:20:02+5:30
शहापूरमधील घटनेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर दुर्घटनेत आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून मदत व बचावकार्य अद्यापही सुरू आहे. या भीषण दुर्घटनेत ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्रीच या घटनेची दखल घेत मंत्री दादा भुसे यांना घटनास्थळावर पाठवले होते. तर, प्रशासनालाही सर्वोतोपरी मदतीचे निर्देश दिले होते. तसेच, घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत.
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १८ जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
सदर घटनेवरुन विविध प्रतिक्रिया येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यावर ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. शहापूर येथे समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना क्रेन कोसळून १६ कामगारांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. ही घटना दुर्दैवी असून अशा घटना टाळण्यासाठी काटेकोर खबरदारी घेतली पाहिजे. मृतात्म्यांस भावपूर्ण श्रध्दांजली आणि जखमींना लवकरात लवकर बरं करण्यासाठी प्रार्थना, असं उद्धव ठाकरेंनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
शहापूर येथे समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना क्रेन कोसळून १६ कामगारांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. ही घटना दुर्दैवी असून अशा घटना टाळण्यासाठी काटेकोर खबरदारी घेतली पाहिजे.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 1, 2023
मृतात्म्यांस भावपूर्ण श्रध्दांजली आणि जखमींना लवकरात लवकर बरं करण्यासाठी…
दरम्यान, शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गपासून ५ ते ६ किलोमीटर ग्रामीण भागात असलेल्या सरलांबे गावच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी काल रात्री ११ वाजल्याच्या सुमारास १७ कामगार आणि ९ इंजिनियर उपस्थितीत काम सुरू असतानाच अचानक लॉन्चरसह गर्डर हे तिथे काम करणाऱ्या कामगारांवर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच सर्वांआधी स्थानिक गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. त्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन टीम, इतर कामगांरानी मिळून क्रेनच्या साह्याने गर्डर खाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढले.
पंतप्रधान मोदींचे ट्विट
नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शहापूर दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. शहापूर दुर्घटनेच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.