५० खोक्यांची घोषणा काश्मीरपर्यंत गेली; ठाण्यात लवकरच मोठी सभा घेणार, उद्धव ठाकरेंची घोषणा
By अजित मांडके | Published: January 26, 2023 02:43 PM2023-01-26T14:43:17+5:302023-01-26T14:43:58+5:30
ठाण्यातील जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हे शिबीर पार पडत आहे. या शिबिराचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
ठाणे- अस्सल निष्ठावंत येथे आहेत. बाकीचे काय भावाने विकले हे तुम्हाला माहित आहे. ५० खोक्यांची घोषणा काश्मिरपर्यंत गेल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तर ठाण्यात लवकरच सभा घेतली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
ठाणे जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांची २७ जानेवारी रोजी जयंती आहे. यानिमित्ताने आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हे शिबीर पार पडत आहे. या शिबिराचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यातील बहुतांश नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षाला सर्वाधिक फटका ठाण्यात बसला आहे. याच ठाण्यात ठाकरे गटाने आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. या आरोग्य शिबीरास उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळेस ठाकरे उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी जागतिक संकट आले होते.
सर्व धर्मियांनी सहकार्य केले. मंदिर बंद होते तेव्हा डाॅक्टर, पोलीस, नर्स यांसारखे सर्व देव म्हणून आले होते. राजकारणाच्या घाणीत न जाता तुम्ही निष्ठेने काम करता. याला शिवसैनिक म्हणतात. असेही ते म्हणाले. अस्सल निष्ठावंत येथे आहेत. बाकीचे काय भावाने विकले हे तुम्हाला माहित आहे. ५० खोके घोषणा काश्मिरपर्यंत पोहचल्याची टिकाही त्यांनी शिंदे गटावर केली. तसेच काही दिवसांत ठाण्यात प्रचंड सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.