घनकचरा करवसुलीस माजी नगरसेवकाचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:31+5:302021-06-26T04:27:31+5:30
कल्याण : केडीएमसीने उत्पन्नवाढीचे मार्ग शोधले पाहिजेत; मात्र ते मार्ग नागरिकांच्या माथी कराचा बोजा वाढविणारे नसावेत. मनपाने घनकचरा करवसुलीची ...
कल्याण : केडीएमसीने उत्पन्नवाढीचे मार्ग शोधले पाहिजेत; मात्र ते मार्ग नागरिकांच्या माथी कराचा बोजा वाढविणारे नसावेत. मनपाने घनकचरा करवसुलीची सुरुवात करून कोरोनाकाळात आर्थिकदृष्ट्या बेजार झालेल्या नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. त्यामुळे या करवसुलीला शिवसेनेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांनी विरोध केला आहे.
मनपाने घनकचरा व्यवस्थापन करापोटी प्रत्येक मालमत्ताधारकाकडून दर दिवसाला दोन रुपये याप्रमाणे वर्षाला ७२० रुपये इतकी रक्कम मालमत्ताकराच्या बिलात आकारण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाकाळात नागरिकांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काहींच्या पगारात कपात झाली आहे. अशा अडचणी असताना मनपाने हा नवा कर लादला असून, तो रद्द करावा, अशी मागणी म्हात्रे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
म्हात्रे यांनी यापूर्वी अनेकदा पाणी चोरीविरोधात आवाज उठविला आहे. मनपा हद्दीतील अनेक मालमत्तांकडून कर आकारला जात नाही. त्यांच्याकडून करआकारणी सुरू केल्यास मनपाच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी एक हजार कोटींची भर पडू शकते. तसेच हजारो बेकायदा नळजोडण्या नियमित केल्यास त्यातून कोट्यवधी रुपये मिळतील; मात्र मनपाने त्याकडे दुर्लक्ष करत नागरिकांच्या माथी कचरा कर लादला आहे, असे ते म्हणाले.
सामान्य करदाते वाऱ्यावरच
- मनपाने २०११ ते २०२० दरम्यान विकासकामांवर २६ हजार कोटींचा भांडवली खर्च केला आहे. तरीही विकासकामे अपूर्ण आहेत.
- मनपाने मोकळ्या जागेवरील करात बिल्डरांना सूट दिली. त्यावेळी सामान्य नागरिकांना मालमत्ताकरात सूट देण्याचे आश्वासन दिले होते.
- बिल्डरांना सूट देऊन ते थकीत रकमेचा कोट्यवधींचा भरणा करत नसल्याने मनपाने दोनदा अभय योजना राबविली आहे. बिल्डरांना सूट देताना सामान्य करदात्यांचा विचार केला जात नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.
------------------