संतप्त नागरिकांसह माजी नगरसेवकाचे साचलेल्या पाण्यात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:03+5:302021-07-22T04:25:03+5:30
कल्याण : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कल्याण पूर्व भागातील आडीवली ढोकली परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी ...
कल्याण : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कल्याण पूर्व भागातील आडीवली ढोकली परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. रस्ते जलमय झाले आहेत. याकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याच्या निषेधार्थ स्थानिक माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी संतप्त नागरिकांसह साचलेल्या पाण्यात ठिय्या आंदोलन केले. या वेळी प्रशासनाच्या निषेधार्थ नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आडीवली ढोकली परिसरातील समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले तरी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. पावसामुळे या परिसरातील रस्ते खराब झाले. या खड्डेमय रस्त्यांतून मार्गक्रमण करताना नागरिकांना अपघातांचा सामना करावा लागतो. प्रशासनाने ठिय्या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर यापुढे कल्याण-शीळ रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा पाटील यांनी दिला.
या परिसरात राहणारी एक संतप्त गृहिणी म्हणाली, घरात तीन दिवसांपासून पावसाचे पाणी शिरले आहे. घरातील टीव्ही, फ्रीज आणि अन्य उपकरणे खराब झाली. गटाराचे पाणी घरात आहे. अशा घरात राहायचे कसे? तिचे पती पॅरेलिसीसने आजारी आहेत. पाणी साचलेल्या खराब रस्त्यातून घरापर्यंत रिक्षा येत नाही. माझी सून गरोदर आहे. आम्ही जायचे कुठे आणि राहायचे कुठे?
अन्य एका महिलेने सांगितले की, कर्ज काढून - अंगावरील दागिने विकून आम्ही या ठिकाणी घर घेतले. आता आम्ही विष खाऊन मरायचे का? केवळ कोरोनाचे कारण देत महापालिका काहीच पावले उचलत नाही. केडीएमसीने काहीच उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही आत्महदन करू.
फोटो-कल्याण-आंदोलन
--------------------
वाचली.