ठाणे जिल्ह्याचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्रीकांत मिसाळ यांचे निधन
By प्रज्ञा म्हात्रे | Published: January 18, 2024 04:21 PM2024-01-18T16:21:24+5:302024-01-18T16:21:47+5:30
ठामपाचे ज्येष्ठ अभियंता दिवंगत यशोवर्धन मिसाळ तथा ज्येष्ठ पत्रकार दिवंगत राजवर्धन मिसाळ यांचे ते पिताश्री होय.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे जिल्ह्याचे माजी जिल्हा माहिती अधिकारी, ठामपाचे जनसंपर्क अधिकारी तसेच ठामपा उपायुक्त श्री. श्रीकांत मिसाळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ठामपाचे ज्येष्ठ अभियंता दिवंगत यशोवर्धन मिसाळ तथा ज्येष्ठ पत्रकार दिवंगत राजवर्धन मिसाळ यांचे ते पिताश्री होय.
गुरुवारी सकाळी ठाण्याच्या जवाहर बाग वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळकृष्ण कथा श्रीकांत मिसाळ हे मूळचे कोल्हापूर निपाणी जवळचे. माहिती खात्यात जिल्हा माहिती अधिकारी आल्यानंतर त्यांनी आपली सेवा वर्ग करून ठाणे महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणून आपली कारकीर्द जबरदस्त गाजवली. नगरसेवकांच्या बरोबरीने कार्य करणारे अतिशय गंभीर, प्रचंड बुद्धिजीवी असलेले मिसाळ नंतर ठामपाचे उपायुक्त देखील झाले. आणि जनसंपर्क विभागातून महानगरपालिकांमध्ये सेवा वर्ग करून घेण्याची पद्धत त्यांच्यापासूनच सुरू झाली. जुन्या ठाण्याचा अचूक अंदाज असलेले मिसाळ एक चालती बोलती संस्था होती. राज्यातल्या अनेक मान्यवरांशी आणि बुद्धिजीवींशी त्यांचा जवळचा घरोबा होता. प्रचंड शिस्त आणि गंभीर स्वभाव यामुळे त्यांचा प्रशासनात दबदबा असायचा.
तात्कालीन प्रशासक श्रीनिवास सोहनी यांच्यासोबत महापालिका स्थापन होत असताना त्यांनी भरीव कार्य केले तर सेवेचा समारोप चंद्रशेखर सारख्या अधिकाऱ्यांबरोबर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. दिवंगत लता मंगेशकर तथा दिवंगत इंदिरा गांधी यांच्या सोबतही मिसाळ आणि काम केले. कोरोनाच्या पहिल्याच लाटेत त्यांचे पुत्र ज्येष्ठ पत्रकार राजवर्धन मिसाळ आणि पत्नी यांचे एक दिवसाच्या फरकाने निधन झाले. खरंतर ते हा धक्का पचवू शकले नव्हते मात्र तरीही नेटाने उभे राहून त्यांनी अनेक गोष्टी मार्गी लावल्या.