माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक वैभव कदम यांची रेल्वेखाली आत्महत्या
By जितेंद्र कालेकर | Published: March 29, 2023 03:20 PM2023-03-29T15:20:58+5:302023-03-29T15:21:52+5:30
ठाणे रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरु
ठाणे : माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा दरम्यान उपनगरी रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ९.०५ वाजताच्या सुमारास घडली. अभियंता अनंत करमुसे प्रकरणी ठाणे पोलिसांकडून त्यांची गेल्या काही दिवसापासून चौकशी सुरु होती. आता या आत्महत्या प्रकरणाचा ठाणे रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
कदम यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागचे
नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. मात्र, मुबंई पोलिसांच्या विशेष सुरक्षा दलात (एसपीयू) मध्ये नेमणूकीला असलेल्या कदम यांचा आव्हाड यांच्या ठाण्यातील "नाद' बंगल्यावर करमुसे यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणात आरोपी म्हणून समावेश होता. यात अटक झाल्यानंतर त्यांची जामीनावर सुटकाही झाली होती. त्यांची याच प्रकरणात गेल्या काही दिवसापासून ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरु होती. त्यामुळेही ते तणावाखाली असल्याचे बोलले जाते.
बुधवारी सकाळी दिवा ते रोहा अशी जाणाऱ्या मेमो उपनगरी खाली निळजे ते तळोजा दरम्यान त्यांनी स्वतःला झोकून दिले. घटनास्थळी त्यांचे शीर आणि हात धडावेगळे झाले. त्यांना तातडीने तशाच अवस्थेत दिवा येथील बालाजी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्याकडे मोबाईल आणि काही पैसे मिळाल्याचे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.
आरोपी नसल्याचे मोबाईलवर ठेवले स्टेट्स
वैभव यांनी मृत्यू पूर्वी आपल्या मोबालवर एक स्टेट्स ठेवले आहे. पोलीस आणि मीडियाला विनंती आहे की, यात आपण आरोपी नाही, असा मजकूर यामध्ये आहे.