कोरोनामुळे नाका कामगारांवर पोट भरण्याची पंचायत, माजी महापौर शिंदे यांनी केले रेशन साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 03:26 PM2020-03-31T15:26:55+5:302020-03-31T15:29:08+5:30
घोडबंदर भागात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी नाका कामगारांसाठी रेशन उपलब्ध करुन दिले आहे. त्याचे वाटपही अतिशय सोशल डिस्टेंट ठेवून करण्यात आले. तर या निमित्ताने महापालिका नगरसेवकांचे मानधन या आजारासाठी देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
ठाणे : राज्यात कोरोनाच्या रु ग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांनी घराबाहेर न पडता अधिक सतर्कता बाळगली पाहिजे. कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला असून संक्र मण होऊ नये म्हणून घरीच बसा असा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गरीब लोकांचा रोजगार धोक्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हातावर पोट असणाऱ्या नाका कामगारावर उपासमारीची वेळ आली असल्याने त्यांच्याकडे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मदतीचा हात पुढे करत, माणुसकी म्हणून त्यांना हातभार लावला आहे.
ठाण्यातील मानपाडा परिसरात अनेक नाका कामगार राहतात त्यांची रोजीरोटी गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शिंदे यांनी नाका कामगारांना पुढील काही दिवसाचा पुरेल इतके राशन वाटप केले आहे. यामध्ये तांदूळ, डाळ, तेल, पीठ आणि साखर यांचा समावेश आहे. नाका कामगारांनी रेशनचे वाटप झाल्याने समाधान व्यक्त केल आहे. तर आमदार खासदार यांच्या मानधन आणि वेतन ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे सुपूर्द केले आहे त्या नुसार पालिका नगरसेवकांचे देखील मानधन दयावे अशी मागणी त्यांनी केली आहे.