माजी मंत्री सत्यपाल सिंग यांची ठाण्यात साक्ष, दरोड्याच्या गुन्ह्यातील शेवटचे साक्षीदार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:50 AM2020-01-11T00:50:25+5:302020-01-11T00:50:31+5:30
कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले सत्यपाल सिंग हे शुक्रवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष मकोका न्यायालयात साक्ष देण्यासाठी आले होते.
ठाणे : माजी केंद्रीय मंत्री, माजी पोलीस महासंचालक तसेच २०१२ साली कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले सत्यपाल सिंग हे शुक्रवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष मकोका न्यायालयात साक्ष देण्यासाठी आले होते. त्यांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी परवानगी दिली होती. या मुद्यावर न्यायालयाने त्यांची साक्ष नोंदवली. या गुन्ह्यातील ते शेवटचे, तेविसावे साक्षीदार ठरले आहेत.
सध्या पालघरमध्ये आणि यापूर्वी ठाणे जिल्ह्यात असलेल्या मनोर पोलीस ठाण्यात २०१२ साली घडलेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यात पाच जणांना अटक झाली होती. त्या पाचही जणांनी संघटित गुन्हेगारीद्वारे त्या परिसरात दहशत पसरवली होती. त्यांच्याविरुद्ध कायदा व सुव्यवस्था (कोकण) विभागाचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक असलेले सत्यपाल सिंग यांनी त्यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी परवानगी देत, दोषारोपपत्र दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार, ते प्रकरण विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.वाय. जाधव यांच्या न्यायालयात आल्यावर विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी आतापर्यंत २२ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सत्यपाल सिंग यांची शेवटची साक्ष शुक्रवारी न्यायालयाने नोंदवली.