काल्हेर गावांत झालेल्या हाणामारीप्रकरणी माजी आमदारावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:56 AM2017-12-14T02:56:20+5:302017-12-14T02:56:28+5:30
भिवंडी तालुक्यातही जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी किरकोळ हाणामारी उत्साहात मतदान झाले. दुपारनंतर मतदानाचा जोर वाढला.
भिवंडी/अनगाव : भिवंडी तालुक्यातही जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी किरकोळ हाणामारी उत्साहात मतदान झाले. दुपारनंतर मतदानाचा जोर वाढला. काल्हेर गावांत झालेल्या हाणामारीप्रकरणी माजी आमदार तथा काँग्रेसचे स्थानिक नेते योगेश पाटील यांच्यासह त्यांच्या आठ समर्थकांवर गुन्हा दाखल झाल्याने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपा व शिवसेनेच्या उमेदवारांत अटीतटीची लढत असल्याने दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून ही निवडणूक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे आणि भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती. काल्हेर येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मतदान केंद्रात शिवसेनेचे उमेदवार दीपक म्हात्रे सारखे येत-जात होते. तेव्हा योगेश पाटील व त्यांच्या समर्थकांनी पोलीसांना उमेदवार म्हात्रे यांना केंद्राबाहेर काढण्याची मागणी केली. त्याचवेळी दीपक म्हात्रे तेथे आले तेव्हा योगेश पाटील व त्यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेतून योगेश पाटील व त्यांच्या समर्थकांनी ठोशाबुक्क््याने मारहाण केल्याची तक्रार दीपक म्हात्रे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार पोलिसांनी योगेश पाटील, काल्हेरचे माजी सरपंच संजय पाटील हरेश जोशी, गौरव पाटील, बळवंत म्हात्रे, अशोक पाटील, भरत जोशी, पंकज म्हात्रे याांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवीगाळ, धक्काबुक्की व हाणामारी झाल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमावास पांगविले.
राहनाळ गावात मंगळवारी रात्री खासदार कपिल पाटील कार्यकर्त्यांना भेटण्यास गेले असताना विरोधी गटाच्या महिलांनी त्याला हरकत घेतली. या वेळी गोंधळात पोलिसांनी एका दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. या घटनेबाबत खासदार पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या घटनेची चित्रफीत सोशल मीडियावरून रात्रभर फिरल्याने भाजपा आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांत तणाव होता. काल्हेर, खारबाव, कोन, शेलार, अंजूर, कांबा, म्हापोली, दाभाड, पडघा, बोरीवली, रहानाळ, अंबाडी, कारीवली, खोणी अशा मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची बाचाबाची होत असल्याने तणावपूर्ण वातावरण होते.
जिल्हा परिषद,
पंचायत समिती
बहुसंख्य ठिकाणी शिवसेना व भाजपामध्ये चुरशीची टक्कर असल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने अनेक ठिकाणी वातावरण तंग होते. मतदानयादीत मृत व दुबार नावे असल्याने मतदान केंद्रात सतत हरकती, ओळखपत्राची मागणी सुरू होती. त्यातून शाब्दिक चकमकी होत होत्या. यादीतील गोंधळामुळे अनेक मतदारांना मतदान करता आले नाही.