वाहतूक काेंडीचा माजी खासदार राजन विचारेंनाही फटका; पाेलिस आयुक्तांकडे मांडले गाऱ्हाणे
By जितेंद्र कालेकर | Updated: September 5, 2024 20:35 IST2024-09-05T20:35:29+5:302024-09-05T20:35:44+5:30
राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही याच काेंडीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरुन आंदाेलन केले.

वाहतूक काेंडीचा माजी खासदार राजन विचारेंनाही फटका; पाेलिस आयुक्तांकडे मांडले गाऱ्हाणे
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: घाेडबंदर मार्गावर गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक काेंडी झाली. याच काेंडीचा मुंबईकडे निघालेले ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनाही फटका बसला. तब्बल चार तास याच काेंडीत ते अडकले हाेते. त्यामुळेच आम्हाला नकाे विकास, नकाे ठाण्याचा मुख्यमंत्री आम्हाला वाहतूक काेंडीतून सुटका द्यावी, अशी मागणीच करणारे निवेदन विचारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांना दिले. दाेन दिवसांमध्ये जर या वाहतूकीत सुधारणा झाली नाहीतर तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशाराही विचारे यांनी यावेळी दिला. दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही याच काेंडीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरुन आंदाेलन केले.
विचारे यांच्यासह शिष्टमंडळाने डुंबरे यांची भेट घेत हे निवेदन दिले. मुख्यमंत्री ठाण्यातील असल्याने शहरात फिरत असताना शहरातील अंतर्गत रस्ते सुद्धा बंद केले जातात. तसेच सध्या ठाण्यातील राजकारण्यांना व त्यांच्या स्वीय सहाय्यक (पी ए) आणि कुटुंबियांना दिलेली सुरक्षा कमी करून नाक्या-नाक्यावर वाहतूक पोलीस अधिकारी तैनात करावेत.
तसेच गेल्या २ वर्षापासून मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्यामुळेही वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे. वारंवार प्रशासनाला कळवूनही त्याचे योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्याने प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचा आराेपीही विचारे यांनी आपल्या निवेदनात केला आहे. नवी मुंबई आणि पुण्याप्रमाणे दिवसा ठाणे शहरात जड अवजड वाहनांना बंदी केली जावी, याकडेही विचारे यांनी पाेलिस आयुक्तांचे लक्ष वेधले. स्कूल बसेस शाळेच्या कॅम्प्स मध्ये न लावता बाहेरील रस्त्यावर उभी केली जातात त्यामुळेही हिरानंदानी ते ठाणे प्रवासाला एक तास लागताे, असेही त्यांनी यात म्हटले आहे. वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडवणारे शासन प्रशासन काेंडीला जबाबदार असल्याचा आरोप ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन
ठाण्यातील कोंडीला वाहतूक पोलिसांचे फसलेले नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल आणि अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. आंदोलकांनी वाहतूक पोलीस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.