माजी रणजीपटू चांदोरकर यांनी पूर्ण केले वयाचे नाबाद शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 01:06 AM2020-11-22T01:06:22+5:302020-11-22T01:06:52+5:30

वृद्धाश्रमामध्ये वाढदिवस साजरा : एमसीएकडून मानाची टोपी प्रदान

Former Ranji Trophy player Chandorkar completes unbeaten century | माजी रणजीपटू चांदोरकर यांनी पूर्ण केले वयाचे नाबाद शतक

माजी रणजीपटू चांदोरकर यांनी पूर्ण केले वयाचे नाबाद शतक

Next

अंबरनाथ : महाराष्ट्र तसेच मुंबई संघाकडून रणजी क्रिकेट खेळलेले ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू रघुनाथ चांदोरकर यांनी शनिवारी वयाचे शतक पूर्ण केले. यानिमित्त चांदोरकर यांच्या शंभराव्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन येथील कमलधाम वृद्धाश्रमात केक कापून कुटुंबीयांसमवेत दणक्यात साजरे करण्यात आले. यानिमित्ताने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मानाची टोपी आणि सन्मानपत्र देऊन चांदोरकर यांचा यथोचित सन्मान केला.
चांदोरकर यांचे पणतू पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर सहकुटुंब उपस्थित होते. वृद्धाश्रमाच्या संचालिका आणि अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे आदींनी उत्साही वातावरणात चांदोरकर यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचे अभीष्टचिंतन केले.

मधल्या फळीतील फलंदाज आणि लेगस्पिनर अशी अष्टपैलू खेळाडू ओळख असलेले चांदोरकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे झाला. १९४६ ते ४७ या कालावधीत पाच रणजी सामन्यांंत त्यांनी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले होते. यानंतर ते १९५०-५१ च्या मोसमात मुंबई संघाकडून दोन रणजी सामने खेळले होते. मुंबईत पुरुषोत्तम शिल्ड आणि कांगा लीग क्रिकेट स्पर्धेतही त्यांनी शानदार खेळी केली होती. क्रिकेटप्रमाणेच फुटबॉल आणि हॉकी खेळामध्येही त्यांना आवड होती. असे असले तरी त्यांनी क्रिकेटला प्राधान्य दिले.  चांदोरकर गेल्या काही वर्षांपासून आजारी असल्याने अंथरुणाला खिळून आहेत. त्यांची वद्धाश्रमात सेवा केली जात आहे.

आजारी असतानाही शुभेच्छा देणाऱ्यांचे हसतमुखाने केले स्वागत 
सध्या डोंबिवलीत असणारे चांदोरकर आजारी असल्याने त्यांच्यासाठी केअर टेकरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, कोरोना कालावधीत केअर टेकर घरी येत नसल्याच्या कारणावरून त्यांची सोय सध्या अंबरनाथ येथील कमलधाम वृद्धाश्रमात करण्यात आली आहे. चांदोरकर यांचा शनिवारी वाढदिवस म्हणून ते राहत असलेली त्यांची खोली सजवण्यात आली होती. वाढत्या वयोमानानुसार त्यांची स्मृती धूसर झाली असली, तरी आजही या वयात त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांचे हसतमुखाने स्वागत केले.

Web Title: Former Ranji Trophy player Chandorkar completes unbeaten century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.