माजी महसूलमंत्री वर्तक यांची जमीन हडपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:17 PM2019-01-30T23:17:37+5:302019-01-30T23:18:03+5:30
मयत असणाऱ्यांना दाखवले जिवंत : भूमाफियांवर गुन्हे दाखल, बनावट दस्त आणि खोट्या सह्या
- अजय महाडिक
ठाणे : माजी महसूलमंत्री, पद्मश्री हरी गोविंद उर्फ भाऊसाहेब वर्तक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेली वसई तालुक्यातील कोट्यवधी रु पयांची जमिन बनावट दस्त आणि खोट्या सह्या करून हडप केल्या प्रकरणात आगाशी येथील महेश यशवंत भोईर व त्याचे दोन साथीदार विजय अनंत पाटील, राजेश पी. कामत यांचेवर अर्नाळा सागरी पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
मौजे आगाशी येथील सर्वे क्र मांक २३३/१ अ या जागेचे मुळ मालक हरी गोविंद उर्फ भाऊसाहेब वर्तक, नरसिंग वर्तक, रघुनंदन वर्तक, हरीहर वर्तक, परशुराम वर्तक, महादेव वर्तक, पुरु षोत्तम शहा, अमृतलाल शहा व कांतीलाल शहा हे सर्व मयत असताना त्यांच्या नावे कुळमुखत्यार पत्र तयार करून त्यावर महेश यशवंत भोईर यांनी मयत व्यक्तींच्या खोट्या सह्या केल्या. आणि या कुळमुखत्यार पत्राच्या आधारे महेश यशवंत भोईर यांनी बनावट खरेदीखत तयार करून ती जमिन विकत घेतल्याचे दाखवून त्या जागेचा सात बारा स्वत:च्या नावे केला होता.
आगाशी येथील अनिकेत वाडीवकर यांनी मागील वर्षी हे प्रकरण उघडकीस आणले होते. या गुन्ह्याबाबत अनिकेत वाडीवकर यांनी पोलिस महानिरीक्षक कोंकण विभाग व पोलिस अधिक्षक पालघर यांना तक्रारी दिल्या होत्या. तसेच त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. मात्र जमिनीचे मुळ मालक मयत असल्यामुळे गुन्हा दाखल होण्यास वेळ लागला होता. मात्र, सरते शेवटी पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचे पुतणे विकास नरसिंग वर्तक उर्फ विकास बंधु यांनी ‘‘ वर्तक कुटुंबियांची फसवणूक करणाºया गुन्हेगारांना शासन झालेच पाहिजे ’’ अशी खंबीर भूमिका घेतली आणि भूमाफिया महेश यशवंत भोईर याच्या दबावाला न जुमानता अर्नाळा सागरी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
बोळींज येथिल सर्वे क्र मांक ४१६ ही वर्तक कुटुंबियांच्या मालकीची जमिन बनावट दस्तऐवज तयार करून परस्पर विकल्या प्रकरणी वर्तक कुटुंबियांनी या आगोदरच संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केलेला आहे. महेश भोईर व त्याच्या साथीदारांनी बनावट कुळमुखत्यार पत्राच्या आधारे मयत व्यक्ति जिवंत आहेत असे भासवून बनावट खरेदीखताची दस्त नोंदणी केल्याचे, तसेच खोटे सरकारी शिक्के वापरु न, नकली मुद्रांक व नकली शासकीय मोहोर बनवून सार्वजनिक नोंद पुस्तकाचे बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कब्ज्यात बाळगून, तसेच दस्तऐवज अधिप्रमाणित करण्याकरिता वापरले जाणारे नकली बोधचिन्ह तयार करून त्याचा वापर केल्यामुळे त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार फरार, आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना
माजी महसूलमंत्री, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक आणि कुटुंबियांच्या फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार महेश भोईर सध्या फरारी असून त्याचा शोध घेण्याकरीता पोलिस पथके रवाना करण्यात आलेली आहेत. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस स्टेशन येथे संपर्क साधला असता लवकरच भोईर आणि त्याच्या साथीदारांना लवकरच पकडण्यात येईल असे उत्तर मिळाले.
याआधी बारीवाडा गावातील तिवरांच्या कत्तली प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस स्टेशन येथे त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याच प्रमाणे बोळींज येथील सर्वे नं. ३९२ या म्हाडाच्या जागेचे बनावट दस्त तयार करून, त्या जागेत अतिक्र मण करून तेथे अवैध बांधकाम करून जागा हडप केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा म्हणून म्हाडाचा पाठपुरावा सुरू आहे.