बविआच्या माजी स्थायी सभापतीला ठोशाबुक्यांनी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 11:26 AM2024-07-06T11:26:30+5:302024-07-06T11:26:58+5:30
विरारच्या मनवेलपाडा परिसरात शुक्रवारी रात्रीची घटना.
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- बविआची माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास २० ते २५ जणांच्या टोळक्याने ठोशाबुक्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मारहाण बविआच्या माजी नगरसेविकेच्या पतीने केली आहे. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
विरारच्या मनवेलपाडा येथील पाम टॉवर इमारतीत बविआचे माजी स्थायी सभापती व या परिसरातील प्रमुख नेते प्रशांत राऊत (५४) हे राहतात. शुक्रवार रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते रमाकांत उर्फ सोन्या पाटील यांनी राऊत यांना फोन करून राहत्या इमारतीच्या खाली बोलण्यासाठी बोलावले. राऊत खाली आल्यावर तेथे २० ते २५ लोकांचा जमाव हा होता. त्यांनी अचानक प्रशांत राऊत मारहाण करण्यात सुरुवात केली. राऊत यांना वाचवण्यासाठी त्यांचा भाचा स्वप्निल पाटील (३६) हा मध्ये पडला मात्र त्याला देखील मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत राऊत यांना किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी रमाकांत पाटील, इम्तियाज शेख तसेच अन्य २० ते २५ जणांविरोधात बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. रमाकांत पाटील हे माजी नगरसेविकेचे पती आहेत. मारहाण करणारे माझ्याच पक्षातील कार्यकर्ते होते. मात्र त्यांनी मारहाण का केली की ते मला समजले नाही असे प्रशांत राऊत यांनी सांगितले.