ठाण्यात खंडणीप्रकरणी माजी नगरसेवक राजकुमार यादवला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:17 PM2018-11-01T22:17:17+5:302018-11-01T22:21:25+5:30
हिरानंदानी बिल्डरकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या पाच जणांपैकी माजी नगरसेवक राजकुमार यादव याला गुरुवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : हिरानंदानी बिल्डरकडे खंडणीची मागणी करणा-या माजी नगरसेवक राजकुमार यादव याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. त्याच्यासह चौघांना ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपाचा माजी नगरसेवक सुधीर बर्गे याला २७ आॅक्टोबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडील चौकशीमध्ये अरीफ इराकी आणि शौकत मुलाणी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तर, या दोघांच्या चौकशीमध्ये प्रदीप पाटील या आणखी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव समोर आले. पाटील याच्याकडील चौकशीमध्ये बहुजन समाजवादी पार्टीचा माजी नगरसेवक यादव याचे नाव पुढे आले. यादव याने आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. बर्गे, यादव, इराकी, मुलाणी आणि पाटील हे पाचही जण संगनमताने बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी उकळत असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे शर्मा यांनी सांगितले. त्यांनी आणखी कोणाकडे अशा प्रकारे खंडणी उकळली आहे, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.