गढूळ पाणीपुरवठा, मनसेचा पालिका मुख्यालयात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:09 AM2019-07-25T01:09:17+5:302019-07-25T01:09:21+5:30
पुन्हा आंदोलनाचा इशारा : अधिकाऱ्यांना दूषित पाण्याच्या बाटल्या भेट
ठाणे : एकीकडे ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. मात्र, दुसरीकडे ठाणेकरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वरनगरातील रहिवाशांना मागील पाच ते सहा महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. या विरोधात बुधवारी मनसने महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी अधिकारी आणि पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाला गढूळ पाण्याच्या बाटल्याही भेट म्हणून दिल्या.
शहर अभियंता रवींद्र खडताळे यांनी येत्या तीन दिवसांत ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले असले तरी सात दिवसांत जर ही समस्या नाही सोडवली तर अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना हे गढूळ पाणी पाजले जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे. यावेळी पोलिसांनी मनसेच्या १० जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
येथे होतो दूषित पाणीपुरवठा
स्मार्ट ठाण्यात ठाणेकरांना गढूळ पाणी प्यावे लागत असून ही गंभीर समस्या ज्यांच्या समोर मांडायची आहे ते पाणी खात्याचे उपअभियंता अर्जुन अहिरे सुटीवर असल्याने कार्यकर्ते चांगलेच संतापले. त्यांनी थेट आयुक्त कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिला. मात्र, स्वत: नगर अभियंता पाण पुरवठा विभागात आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे समस्या मांडली. वागळे, पाचपाखडी, वर्तकनगर, म्हाडा, लोकमान्यनगर, ज्ञानेश्वरनगर अशा अनेक भागात गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी यावेळी शहर अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले.