'गडकोटांचे संवर्धन झाले पाहिजे, आज ते तग धरुन आहेत, उद्या ते दिसणारच नाही'
By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 28, 2024 03:09 PM2024-03-28T15:09:23+5:302024-03-28T15:09:59+5:30
हमीदा खान यांनी व्यक्त केली खंत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गडकोटांमुळे इतिहासाबदद्लचा आदर निर्माण होतो, तसेच, इतिहासाची माहिती मिळते. नुसती भटकंती न करता आपण त्याचा अभ्यास करु लागतो असे मत गडरागिणी हमिदा खान यांनी व्यक्त केले. गडकोटांचे संवर्धन झाले पाहिजे. आज ते तग धरुन आहे, उद्या ते दिसणारच नाही. त्यामुळे आजच त्याची काळजी घेतली पाहिजे आणि ते जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे कळकळीचे आवाहन हमिदा यांनी केले.
शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्वतर्फे श्री शिवराज्याभिषेक सोहळा जेष्ठ शुद्ध त्रयोदशी (तिथी नुसार) ३५०वे वर्ष साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ६५० किल्ले सर करणाऱ्या दुर्गकन्या हमिदा यांची “शिवाजीमहाराजांच्या गड-दुर्गांची भ्रमंती” याविषयावर शिवकालीन नाणी संग्राहक, अभ्यासक प्रशांत ठोसर यांनी मुलाखत घेतली. हमिदा यांनी ६५० किल्ले सर करताना आलेले अनुभव, अडचणी, मित्रांकडून मिळालेली प्रेरणा हे सांगत आप्पा परब यांनी दिलेले प्रोत्साहन याचा प्रवास उलगडला. माझी गड कोटांची सुरूवात १९९० साली रायगड पासून झाली खरी पण १९९८ साली रायगडला पुन्हा भेट दिल्यावर आप्पांनी रायगडच्या इतिहासाचा खडान खडा सांगितला त्यावेळी सगळेच गडकोट बघण्याचा निश्चय केला आणि १९९९ साली मी एका वर्षात १०० किल्ले सर केले.
आप्पांनी गडकोटांची माहिती दिली नसती तर गडकोटांची भटकंती झाली नसती असे त्यांनी आवर्जुन नमूद केले. छत्रपती शिवरायांचे ३५० किल्ले पार करायला औरंगजेबला किती वेळ लागला असता हे त्यांचे किल्ले पाहिल्यावरच अनुभूती येते. सह्य्ाद्रीतील गडकोट ही आपली दौलत आहे अशी सह्याद्री आपल्याला लाभली याचा मला अभिमान आहे. स्वराज्याची दौलतच हे गडकोट आहेत. या गडकोटांमुळेच महाराजांना स्वराज्य जिंकता आले आहे. महाराजांचे हे गडकिल्लेच स्वराज्याचे साक्षीदार आहेत. काही किल्ले तग धरुन आहेत, काही नामशेष होत आहेत तर काहींचा शोध लागत आहे. नामशेष झालेल्या गडकोटांच्या चिराही आपल्यासाठी पूजनीय आहेत. काही किल्ल्यांमध्ये तर चक्क गाव वसले आहे त्यामुळे गडकोटांच्या खाणाखुणा शोधाव्या लागत आहेत पण त्या दिसल्या तरी महाराजांची प्रचिती येते अशा भावना हमीदा यांनी व्यक्त केल्या.