नदीच्या डबक्यात वीजेचा शॉक लावून मासेमारी, आतापर्यंत अनेकांचा गेला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 01:34 AM2019-06-27T01:34:53+5:302019-06-27T01:35:10+5:30
शहापूर तालुक्यातील सर्वच नद्या सध्या आटल्याने डबक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू असून ही मासेमारी जाळ्याने नाही तर चक्क वीजेचा शॉक देऊन केली जात आहे.
भातसानगर : शहापूर तालुक्यातील सर्वच नद्या सध्या आटल्याने डबक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू असून ही मासेमारी जाळ्याने नाही तर चक्क वीजेचा शॉक देऊन केली जात आहे.
तालुक्यातील केवळ भातसा नदी पाहता सर्वच नद्या आटून गेल्या आहेत. तर ज्या काही नद्या कधी आटल्याचे पाहिले नव्हते, त्या अखेरच्या घटक मोजत आहेत. त्यांच्या खोलगट भागात डबक्यात अजूनही पाणी शिल्लक आहे. या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासे असल्याने सध्या काळू, शाई नदी सारख्या नद्यांमध्ये रात्रंदिवस मासेमारी सुरू असूनही मासेमारी इतकी भयानक आहे.
वीजेच्या पोलवरून वीजेच्या तारांना वायर जोडून त्या वायर दूरवर नदीत नेल्या जात आहेत. त्या सुकलेल्या दोन काठ्यांच्या दोन्ही बाजूच्या टोकांना दोरी बांधून मध्ये वायर लावून ती सोलून तिला शॉक दिला जातो. या काठ्या जितक्या दूरवर नेता येतील तितक्या त्या न्यायच्या. या तारेच्या संपर्कात जेवढे जीव येतील तेवढे तात्काळ त्या शॉकने मरून जातात. मात्र, जर का अनवधानाने ही तार काढणारा बेसावध राहिला तर मात्र मासेमारी करणारे आपला जीव गमावून बसण्याची मोठी शक्यता आहे.
सापगाव, खुटघर, सरलांबा, शाई, मढ, चिरव यासारख्या अनेक गावांमधील लोक शॉक लागून मृत्यूमुखी पडल्याची उदाहरणे समोर असतानाही आजही अशा प्रकारची मासेमारी केली जात आहे. शनिवार, रविवारी या प्रकारच्या मासेमारीला तर उधाणच येते.
या प्रकारच्या मासेमारीमुळे जलसंपदाही ही धोक्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मासेमारीवर कडक नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. या बाबीकडे वीज कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे.
आज तालुक्यातील सर्वच नदी पात्रात वीजेचे शॉक लावून मासेमारी केली जाते. मात्र, ती अतिशय जीवघेणी असल्याने अशी मासेमारी कुणीही करू नये.
- जयराम शांताराम भोईर, सामाजिक कार्यकर्ते
विजेच्या खांबावरून वायरिंग जोडून शॉक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल.
- अविनाश कटकवार,
अभियंता, महावितरण