ठाण्यात साडेचार हजार धोकादायक इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:16+5:302021-05-12T04:41:16+5:30
ठाणे : पावसाळा सुरू झाला की धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न दरवर्षी ठाणे शहराला सतावत असतो. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी ...
ठाणे : पावसाळा सुरू झाला की धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न दरवर्षी ठाणे शहराला सतावत असतो. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी इमारतींचा सर्व्हे केला जात असतो. त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीत यंदा ४ हजार ५२२ इमारती या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ७३ इमारती या अतिधोकायक असून, त्या खाली करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. मागील वर्षी शहरात चार हजार ३०० धोकादायक इमारती होत्या. यंदा त्यात जवळ जवळ २२२ ने वाढ झाली आहे.
पावसाळा जवळ आला की महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज आहे, याचा आढावा घेतला जातो. तसेच जुन्या इमारती पडण्याचा प्रश्न अधिक प्रमाणात सतावत असतो. त्यामुळे अशा इमारतींचा सर्व्हे करून कोणत्या इमारती तत्काळ पाडणे गरजेचे आहे, कोणत्या इमारतींची डागडुजी होऊ शकते. याचा अभ्यास केला जातो. त्यानुसार महापालिका घोषित करीत असलेल्या धोकादायक इमारतींपैकी सी-१ अर्थात अतिधोकादायक इमारतीचा प्रकार असून, अशी इमारत नोटीस बजावल्यानंतर काही कालावधीनंतर जमीनदोस्त केली जाते, तर सी-१- एमधील म्हणजे धोकादायक इमारती रिकाम्या करून त्याची संरचनात्मक परीक्षण केले जाते.
यंदा केलेल्या सर्वेक्षणात महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समितींमधील चार हजार ५२२ धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये अतिधोकादायक ७३ इमारतींचा समावेश आहे. त्याचबरोबर सी- २ एमध्ये १५४ इमारतींचा समावेश आहे. तर सी २ बीमध्ये दोन हजार ४१६ आणि सी ३ मध्ये एक हजार ८७९ इमारतींचा समावेश आहे. या इमारतींची दुरुस्ती करता येणे शक्य आहे. त्यामुळे या इमारतधारकांना नोटिसा बजावून दुरुस्ती करण्याचे सूचित केले आहे. परंतु, सध्या कोरोनाचे सावट असल्याने महापालिका या इमारती खाली करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच रहिवासीदेखील त्या खाली करण्यास तयार होणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या या परिस्थितीत डोक्यावर आसरा नसला तर जायचे कुठे, असा सवाल अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी केला आहे.
-सर्वाधिक अतिधोकायक इमारती कोपरी-नौपाड्यात
महापालिकेने घोषित केलेल्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीत सर्वाधिक सी १ प्रकारात असलेल्या इमारती ४३ असून, त्या कोपरी-नौपाडा प्रभाग समितीत आहेत. या भागातील जुन्या इमारतींचा पुनर्वसनाचा मार्ग अद्यापही सुटू न शकल्याने येथील इमारतींची संख्या ही दरवर्षी वाढत आहे. तर त्या खालोखाल लोकमान्यनगरमध्ये ७, मुंब्य्रात ६, उथळसर ६, माजिवडा मानपाडा १, कळवा ५, दिवा ५ इमारतींचा समावेश आहे. तर वागळे आणि वर्तकनगरमध्ये एकही अतिधोकादायक इमारत नाही. वागळेत अतिधोकादायक इमारत एकही नसली तरी याच प्रभाग समितीत एक हजार ८६ इमारती या धोकादायक आहेत. मुंब्य्रातही एक हजार ४१९ धोकादायक इमारतींचा समावेश आहे.
प्रभाग समितीनिहाय धोकादायक इमारतींची यादी
कोपरी नौपाडा - ४५३
उथळसर - १३४
वागळे - १०८६
लोकमान्यनगर - २१७
वर्तकनगर - ५४
माजिवडा- मानपाडा - १२५
कळवा - १९३
मुंब्रा - १४१९
दिवा - ८४१
--------------------
एकूण ४,५२२