उल्हासनगरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या हत्या प्रकरणी चौघांना अटक
By सदानंद नाईक | Published: November 6, 2023 02:13 PM2023-11-06T14:13:01+5:302023-11-06T14:13:10+5:30
उल्हासनगर : पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील कानडे याच्या हत्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी काही तासात चौघांना ताब्यात घेतले. पूर्ववैमनस्यातून चौघांनी ...
उल्हासनगर : पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील कानडे याच्या हत्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी काही तासात चौघांना ताब्यात घेतले. पूर्ववैमनस्यातून चौघांनी हत्या केल्याचे उघड होऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगरात कॅम्प नं-४, एसएसटी कॉलेज समोरील भोईर गाडी सर्व्हिसिंग सेंटर मागील झाडाझुडपाच्या जागेत एकाचा मृतदेह याल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना रविवारी सकाळी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता, माणेरेगावात राहणारा व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील कानडे याचा मृतदेह असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. अंगावरील मारण्याचा जखमावरून त्याला जबर मारहाण करून मृतदेह झाडाझुडपात फुलून दिल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यादृष्टीने पुढील तपास करून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने काही तासात राम यादव, रोशन वाघ, अमोल कुबड्या व अक्षय गायकवाड या संशयीत चौघांना ताब्यात घेतले. तपासाअंती त्यांनी खुनाची कबुली पोलिसांना दिली असून पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याचे उघड झाले.
पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील कानडे याचा खून झाल्याने, परिसरात भीतीचे वातावरण आहे. कानडे याच्या खुनाने, पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. हत्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या चौघांकडून अधिक माहिती मिळते का? या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. शहरात हाणामारी, खून, फसवणूक, चोरी, खंडणी आदी गुन्ह्यात वाढ झाल्याने, पोलिसही हैराण आहेत.