अवघ्या सव्वा महिन्यांच्या मुलीची चार लाखांमध्ये विक्री करणाऱ्या आईसह चाैघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 05:15 PM2024-11-13T17:15:19+5:302024-11-13T17:16:05+5:30
ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची कारवाई
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अवघ्या ४२ दिवसांच्या मुलीची चार लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या एका महिलेसह दोघांना अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली. याप्रकरणी महिलेसह चार आरोपींविरुद्ध महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील मुलीचीही सुखरुप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.
डोंबिवलीतील विष्णुनगर भागात राहणारी वैशाली सोनावणे (३५, मुळ गाव मालेगाव, जि. नाशिक ) ही दलाल महिला तिच्या लहान बाळांची कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता विक्री करणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याचआधारे उपायुक्त पाटील, सहायक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी आणि उपनिरीक्षक स्नेहल शिंदे आदींच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करुन त्याच्या मार्फतीने यातील संशयित महिला आरोपी हिच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला. त्यानंतर १२ नोव्हेंबर २०२४ रोजी वैशाली हिने बनावट ग्राहकाला फोन करुन त्याच्याकडे विक्रीसाठी एक लहान मुलगी असल्याचे सांगितले. त्यासाठी या महिलेने चार लाखांची मागणी करुन मुलगी कल्याणच्या सहजानंद चौकातील रामदेव हॉटेलसमोर घेऊन येणार असल्याबाबत सांगून आधी मुलीस पाहून नंतर पैसे घेउन या, असेही सांगितले.
याच माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरिक्षक चौधरी यांनी एक विशेष पथक स्थापन केले. या पथकाने तातडीने कारवाई करीत वैशाली हिच्यासह दिपाली दुसिंग (२७, रा. कोपररोड, डोबिवली पश्चिम, मुळ गाव जेतोननगर, नाशिक ), रेखा सोनावणे (३२, भिक मागून उदरनिर्वाह, रा. कल्याण रेल्वे स्टेशन, बाळाची आई) आणि किशोर सोनावणे (३४, रा. डोंबिवली, मुळ गाव मालेगाव, जि. नाशिक ) या चौघांना सव्वा महिन्यांच्या बाळाला विकतांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३, ३(५) सह बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलमांनुसार गुन्हा नोंद केला. यातील चारही आरोपींना अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या बाळाची तसेच तिचा पाच वर्षांचा भाऊ यांना डोंबिवलीतील एका बालकाश्रमात तसेच तिच्या नऊ आणि सात वर्षांच्या दोन बहिणींनाही सुरक्षक्षिततेसाठी अंबरनाथमधील एका बालसदनामध्ये ठेवल्याचे पाेलिसांनी सांगितले.