भिवंडीत पट्टेरी वाघाची कातडी व पंजाची तस्करी करणाऱ्या चौकडीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:41 AM2021-04-22T04:41:24+5:302021-04-22T04:41:24+5:30
भिवंडी : ‘राष्ट्रीय वन्यजीव प्राणी’ असलेल्या पट्टेरी वाघाची कातडी व पंजाची तस्करी करणाऱ्या चौकडीला कोनगाव पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून ...
भिवंडी : ‘राष्ट्रीय वन्यजीव प्राणी’ असलेल्या पट्टेरी वाघाची कातडी व पंजाची तस्करी करणाऱ्या चौकडीला कोनगाव पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली. या तस्करांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रशांत सुशीलकुमार सिंग (वय २१, रा. वडाळा पूर्व, मुंबई), चेतन मंजेगौडा (वय २३, रा. वडाळा, मुंबई), आर्यन मिलिंद कदम (वय २३, रा. वडाळा पूर्व, मुंबई), अनिकेत अच्युत कदम (वय २५, रा. सायन कोळीवाडा, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या चारही तस्करांची नावे आहेत. या चौघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. भिवंडी तालुक्यातील नाशिक-मुंबई बायपास महामार्गावर ठाकुरपाडा गावाच्या हद्दीतील बासुरी हॉटेलच्या समोर काही तस्कर पट्टेरी वाघाचे कातडे व पंजाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांना मिळाली होती. कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी वन विभागाचे कर्मचारी व वॉर रेस्क्यू फाउण्डेशनचे वन्यजीव अभ्यासक सुहास पवार व योगेश कांबळे यांच्यासह सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. कोनगाव पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ३९(३), ४४, ४८(अ), ४९(बी), ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करून लाखो रुपये किमतीचे पट्टेरी वाघाचे सोलून काढलेले, कडक झालेले व सुकलेले कातडे व पाच नखे असलेला पंजा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, हा मुद्देमाल या चारही आरोपींनी कुठून आणला व तो कुणाला विकण्यासाठी चालले होते, याचा तपास पोलिसांनी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पराग भाट, सहा. पोलीस उपनिरीक्षक वामन सूर्यवंशी, पो.हवा. राजेश शिंदे, संतोष मोरे, पो.ना. विनायक मासरे, संतोष पवार, अविनाश पाटील, अशोक ढवळे, कृष्णा महाले व गणेश चोरगे या पोलीस पथकाने तस्करांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करीत आहेत.
........
वाचली