प्रेयसीसाठी तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या चौकडीला ४८ तासात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:45 AM2021-09-22T04:45:03+5:302021-09-22T04:45:03+5:30
मुंब्राः दिव्यात राहत असलेल्या पतीने त्याच्या पत्नीला सोडून निघून जावे, यासाठी त्याला जीवे मारण्यासाठी धमकी दिलेल्या चौकडीला मुंब्रा पोलिसांनी ...
मुंब्राः दिव्यात राहत असलेल्या पतीने त्याच्या पत्नीला सोडून निघून जावे, यासाठी त्याला जीवे मारण्यासाठी धमकी दिलेल्या चौकडीला मुंब्रा पोलिसांनी अंत्यत शिताफीने तपास करून ४८ तासामध्ये अटक केली. न्यायालयाने चौघांनाही २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
१५ सप्टेंबरला रात्री साडेदहा वाजता दिवा-आगासन रस्त्यावर रिक्षा अडवून पिस्तुलचा धाक दाखवून ज्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, त्यांच्या पत्नीशी रूपेश पाटील (वय ३१, शिवधाम अपार्टमेंट, पडले गाव) याचे प्रेमसंबंध सुरू होते. यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला सोडून देण्यासाठी धमकी दिली होती. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शहाजी शेळके, पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले आणि त्यांच्या पथकातील पोलिसांनी या प्रकरणाचा शीघ्र गतीने तपास करून रूपेश याच्यासह साजन पाटील (वय २१,रा. नारायणगाव, अंबरनाथ), सनी राजभर (वय २१, अभिमन्यू हाईट्स, डोंबिवली), अंकित शिंदे (वय २५, रा. वामन बाबावाडी, तळोजा) यांना अटक करून त्यांनी धमकी देण्यासाठी वापरलेले पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे तसेच दुचाकी ताब्यात घेतली. त्यांनी यापूर्वीही २७ डिसेंबर २०२० रोजी दिवा डम्पिंग ग्राऊंडजवळ फिर्यादीला रस्त्यामध्ये अडवून त्याच्याजवळील रोख रक्कम लुटून नेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याची माहिती कड यांनी दिली.