भिवंडीत इंदिरागांधी उपजिल्हा रूग्णालयात महिलेने दिला चार मुलांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 08:02 PM2018-08-10T20:02:43+5:302018-08-10T20:19:27+5:30
भिवंडी : शहरातील स्व. इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा शासकीय रूग्णालयात एका महिलेने चार बाळांना जन्म दिला. शहरातील ही पहिलीच घटना असल्याने या घटने नंतर सर्वांनीच या बाळांना पाहण्यासाठी रूग्णालयांत गर्दी केली.
चार मुलांना जन्म देणारी गुलशन हकीक अन्सारी(२६)ही शहरातील पिराणीपाडा ,शांतीनगर भागात झोपडपट्टी परिसरांत राहणारी आहे. ती गरोदर असताना तिच्या गर्भात चार मुले असल्याची माहिती तीला मिळाली होती. त्यामुळे तीने प्रसुतीसाठी आपले नांव मुंबईतील सायन रूग्णालयांत दाखल केले होते. परंतू आज दुपारी १२ वाजता अचानक तीच्या पोटात दुखू लागल्याने सासरे शकील अहमद अन्सारी व तीच्या कुटूंबीयांनी तीला शहरातील इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयांत दाखल केले. तेथे स्त्रीरोग तज्ञ डॉ. मिनाक्षी शेगावकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री डोंगरे यांनी ताबडतोब प्रसुतीचा निर्णय घेतला. तेंव्हा महिला गुलशन हिने प्रथम मुलीस जन्म दिला नंतर तीन मुले जन्मास घातली. ही प्रसुती नैसर्गिकरित्या झाली असून सर्व मुलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. चारही मुलांची प्रकृती चांगली असून प्रसुतीनंतर बाळ व बाळंतीण सुखरूप असल्याची माहिती रूग्णालयांचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिल थोरात यांनी दिली. या घटने नंतर मुलांना पाहण्यासाठी रु ग्णालयात नागरिकांनी गर्दी केली.