ठाण्यात आढळले डेल्टा प्लसचे ४ रुग्ण; संपर्कात आलेल्या अन्य लोकांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 04:24 PM2021-08-09T16:24:02+5:302021-08-09T16:26:16+5:30
Coronavirus Delta Variant Patients : आरोग्य यंत्रणेकडून संपर्कातील लोकांचा शोध सुरू. अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागाला खडबडून आली जाग.
ठाणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. असे असतांनाच आता ठाण्यात डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळले असल्याची माहिती समोर आली आहे. यातील एक रुग्ण हा नवी मुंबई, तर इतर तीन रुग्ण हे ठाण्यातील असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यानुसार आता त्यांची माहिती घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरीकांचा शोध घेण्याचे काम आता सुरु झाले आहे. त्यातही हे रुग्ण केव्हा आणि कुठे उपचारासाठी दाखल होते, याची माहिती घेण्याचे काम सुरु झाले आहे.
ठाण्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही १ लाख ३६ हजार १८९ रुग्ण आढळले आहेत. त्यातील १ लाख ३३ हजार ५३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ठाण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८.०५ टक्के एवढे आहे. तर मृत्युदर हा १.५२ टक्के एवढा आहे. त्यानुसार आतार्पयत २०६८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तर सद्यस्थितीत ५८४ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरु आहेत. त्यामुळे ठाण्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असताना दुसरी लाटही ओसरु लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परंतु अशातच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरीअंटने ठाण्यात दस्तक दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यात डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ही माहिती आता नवी मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यात आढळलेल्या या चार रुग्णांपैकी ३ रुग्ण हे ठाण्यातील असून एक रुग्ण हा नवी मुंबई भागातील आहे. त्यांचे वय अंदाजे २२ ते ३५ एवढे असून त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. परंतु त्यांचा अहवाल आता आल्याने आरोग्य विभागही आता खडबडून जागा झाला आहे. त्यानुसार आता हे रुग्ण कोणत्या रुग्णालयात दाखल होते, ते कुठे राहणारे आहेत, त्यांच्या संपर्कात आणखी कोण कोण आले होते, याची माहिती घेण्याचे काम आता आरोग्य विभागाने सुरु केले आहे.
डेल्टा प्लसचे जे रुग्ण आढळले आहेत, त्याची माहिती संबधींत महापालिकांना देण्यात आलेली आहे. त्यानुसार त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे. परंतु आता संपर्कातील इतरांचा शोध सुरु केला आहे.
(डॉ. कैलाश पवार - मुख्य जिल्हा शल्यचिकित्सक - ठाणे )
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार तीन रुग्ण हे ठाण्यातील आणि अन्य एक नवी मुंबईतील असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार ठाण्यातील ते रुग्ण कुठल्या भागातील आहेत, याची माहिती घेण्याचे काम आता सुरु करण्यात आले आहे.
(डॉ. वैयजंती देवगीकर - मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा)