सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून ठाण्यातील चार डॉक्टरांची निर्दोष सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 07:20 PM2018-03-14T19:20:45+5:302018-03-14T19:20:45+5:30

Four doctors of Thane acquitted from the allegations of culpable homicide | सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून ठाण्यातील चार डॉक्टरांची निर्दोष सुटका

thane

Next
ठळक मुद्देठाणे न्यायालयाचा निकालमहिलेचे मृत्यू प्रकरण१२ वर्षे चालला खटला

ठाणे : प्रसुतीनंतर आजारी पडलेल्या महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याच्या आरोपातून शहरातील चार डॉक्टरांना मंगळवारी ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. जवळपास १२ वर्षे या प्रकरणाचा खटला चालला.
२00३ साली ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक २ च्या रहिवासी शशिकला विचारे (२५) या गरोदर होत्या. वर्तकनगरातील डॉ. जोग नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते. ७ जुलै २00३ रोजी महिला रोग तज्ज्ञ डॉ. सुजाता राठोड त्यांच्यावर प्रसुतीसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी भूलतज्ज्ञ डॉ. वसंत जोग यांनी त्यांना भूल दिली. प्रसुतीनंतर बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप होते. दोन दिवसांनी शशिकला यांना न्युमोनियाचा त्रास सुरू झाला. त्रास वाढल्याने त्यांना पोखरण रोड क्रमांक २ वरील लोक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये डॉ. आनंद भावे आणि डॉ. गणेश महाजन यांनी त्यांच्यावर उपचार केले. ३ आॅगस्ट २00३ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती शशिकांत विचारे यांनी उपचारातील हलगर्जीमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांवर आरोप केल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी याप्रकरणी डॉ. सुजाता राठोड, डॉ. वसंत जोग, डॉ. आनंद भावे आणि डॉ. गणेश महाजन यांच्याविरूद्ध खून, फसवणूक आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे दाखल केले. काही दिवसांनी पोलिसांनी खुनाचे कलम रद्द करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वाढवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरूद्ध गुन्हे सिद्ध होत नसल्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला. न्यायालयाने तो अमान्य करून आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. दरम्यानच्या काळात शशिकांत विचारे यांनीही न्यायालयामध्ये वैयक्तिक तक्रार दाखल केली. विचारे यांची तक्रार आणि वर्तकनगर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए.एस. भैसारे यांच्या न्यायालयामध्ये एकत्रित सुनावणी झाली.
शशिकला विचारे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा आरोपींचे वकील शैलेष सडेकर यांनी केला. शशिकांत विचारे यांनी लोक हॉस्पिटलमध्ये पत्नीवर केलेल्या उपचाराचा खर्च आजतागायत दिला नसून, डॉक्टरांवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप अ‍ॅड. सडेकर यांनी केला. शशिकांत विचारेंसह इतर साक्षीदारही उलटतपासणीमध्ये टिकाव धरू शकले नाही. शशिकला यांचे शवविच्छेदनच डॉक्टरांनी केले नसल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने यावेळी करण्यात आला. मात्र शवविच्छेदन कोणत्या प्रकरणांमध्ये करायचे, याचे काही निकष असतात. इत:पर मृत्यूनंतर काही तास शशिकला यांचा मृतदेह शासकीय रूग्णालयामध्येच होता. त्यावेळी त्यांच्या पतीने शवविच्छेदनाची मागणीच केली नसल्याचेही बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. जवळपास १२ वर्षे या प्रकरणाचा खटला चालल्यानंतर मंगळवारी न्यायालयाने चारही डॉक्टरांना निर्दोष मुक्त केले.
बालरोग तज्ज्ञही निदोष
शशिकला विचारे यांना कन्यारत्न प्राप्त झाले होते. प्रसुतीनंतर महिनाभरात शशिकला यांचा मृत्यू झाला. त्या न्युमोनियाने ग्रस्त असताना एका बालरोग तज्ज्ञाने त्यांच्या नवजात कन्येची सुश्रुषा केली. त्यांची कन्या सुखरूप असताना विचारे यांनी बालरोग तज्ज्ञालाही या प्रकरणामध्ये आरोपी केले होते. बचाव पक्षाने यावर न्यायालयात आक्षेप नोंदवला होता. जवळपास दोन वर्षानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार या बालरोग तज्ज्ञाचे नाव खटल्यातून वगळण्यात आले होते.

Web Title: Four doctors of Thane acquitted from the allegations of culpable homicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.