ठाण्यात पोलीस असल्याची बतावणी करीत खंडणी उकळणारे चौघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 09:45 PM2019-08-06T21:45:52+5:302019-08-06T21:59:34+5:30
ठाण्यातील एका हॉटेलमध्ये मांसाहारी पदार्थांमध्ये स्पॅपलरची पिन पडल्याचा बहाणा करीत त्याच्याकडून २० हजारांची खंडणी मागून सात हजारांवर तडजोड करणाऱ्या धनाजी दळवीसह चौघा खंडणीबहाद्दरांना नौपाडा पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांची वर्दी, बेडया आणि बनावट रिव्हॉल्व्हरही हस्तगत करण्यात आले आहे.
ठाणे : पोलीस असल्याची बतावणी करु न नौपाडयातील एका हॉटेल चालकाकडून २० हजारांची खंडणी उकळणा-या धनाजी दळवी (२७, रा. मुरबाड, ठाणे), अभिजित उतेकर (२७, रा. खडकपाडा, कल्याण), समीर वडवले (२५, रा. मुरबाड, ठाणे) आणि परेश पाटील (२४, रा. चेंबूर, मुंबई) या चौघांना नौपाडा पोलिसांनी मोठया शिताफीने मंगळवारी पहाटे ५ वा. च्या सुमारास अटक केली आहे. त्यांना ९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
नौपाडयातील ‘हाऊस आॅफ मोमोज’ या हॉटेलमधून धनाजी दळवी या पोलीस अधिका-याच्या गणवेशामध्ये आलेल्या तोतयाने ५ आॅगस्ट २०१९ रोजी रात्री ८ ते १०.४० वाजण्याच्या सुमारास खाण्याचे काही पार्सल खरेदी केले. त्यानंतर काही वेळातच त्याने या पार्सलमध्ये स्पॅपलरची पिन टाकून आपण पोलीस असल्याची बतावणी केली. तर त्याचे इतर दोन साथीदार हातकडी आणि बनावट रिव्हॉल्व्हर घेऊन तिथे आले. त्यांनी या हॉटेलचे मालक वरुण कपूर (३४) यांना गाठून ‘तुमच्या मोमोजमध्ये स्टॅपलिरची पिन आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करण्यासाठी आलो असल्याचे सांगून तिथे असलेल्या एका नोकराला त्यांनी बेडया ठोकल्या. तुम्हाला कारवाई टाळायची असेल तर २० हजार रुपये द्यावे लागतील, असेही त्यांनी कपूर यांना धमकावले. तडजोडीअंती त्यांनी या तोतया पोलिसांना सात हजारांची रोकड सोपवली. तरीही कपूर यांना या संपूर्ण प्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्याच्या शोध पथकाचे पोलीस हवालदार हरिश तावडे यांना संपर्क साधला. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार सुनिल अहिरे, पोलीस नाईक गोविंद पाटील, कॉन्स्टेबल विकास चडचंनकर आणि गोरख राठोड या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हॉटेलजवळ पोलिसांची व्हॅन आलेली पाहून या ठकसेनांच्या टोळीने तिथून पळ काढला. त्यानंतर या पथकाने त्यांचा पाठलाग करुन या चौघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट रिव्हॉल्व्हरसारखे लायटर, दोन बेडया, पोलिसाचा संपूर्ण गणवेश, इतर सामुग्री तसेच खंडणी म्हणून स्वीकारलेली सात हजारांची रोकड त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. या चौघांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.