घोडबंदरवासीयांकडून चार पट कर आकारणी
By admin | Published: April 19, 2017 12:30 AM2017-04-19T00:30:42+5:302017-04-19T00:30:42+5:30
ठाणे महापालिकेने या पुढे भांडवली मुल्यावर आधारीत कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्या आधीच नव्या धोरणानुसार म्हणजेच रेटेबल व्हॅल्युनुसार घोडबंदर
ठाणे : ठाणे महापालिकेने या पुढे भांडवली मुल्यावर आधारीत कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्या आधीच नव्या धोरणानुसार म्हणजेच रेटेबल व्हॅल्युनुसार घोडबंदर भागातील अनेक सोसायट्याना आलेला मालमत्ताकर हा अव्वाच्यासव्वा असल्याने तेथील रहिवासी हैराण झाले आहेत. घोडबंदरचा रेटेबल व्हल्यू मुल्य हे ठाण्यातील इतर ठिकाणांच्या दृष्टीने अधिक असल्याने येथील सदनिकाधारकांना हा टॅक्स आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु,यापुढे जर भांडवली मुल्यावर आधारीत कर वसुली झाली तर यामध्ये आणखी वाढ होणे अपेक्षित असल्याचेही पालिकेने म्हटले आहे.
भांडवली मुल्यावर आधारीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर २०१८- २०१९ या आर्थिक वर्षापासून त्यानुसार कर आकारणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. परंतु, ही प्रणाली लागू होण्यापूर्वीच रेटेबल व्हॅल्यूनुसार घोडबंदर भागातील अनेक नव्या सदनिकाधारकांना तब्बल चारपट अधिक मालमत्ताकर आला आहे. त्यामुळे ही कर आकारणी नेमकी कोणत्या पद्धतीने झाली, कोणत्या तत्वावर झाली यासाठी रहिवासी पालिकेच्या खेटा घालत आहेत. यंदाचा अर्थसंकल्प मांडला जात असताना त्या अर्थसंकल्पातच २०१७ - २०१८ या वर्षापासून निवासी मालमत्तेच्या जललाभ करमध्ये १२ टक्के ऐवजी २२ टक्के,निवासी मालमत्तेच्या मलनि:सारण लाभकर ९ टक्क्यावरून १९ टक्के, निवासी मालमत्तांच्या करात ५ टक्के ऐवजी १५ टक्के वाढ, निवासी मालमत्तांच्या रस्ता करात १० टक्के वाढ सुचवली आहे. यामुळे मालमत्ताकरापासून ४८० कोटी रु पये जमा होऊ शकतील, असा दावा आहे. याबाबत ज्या रहिवाशांना अशी चारपट बिले आली आहेत. त्यांनी पालिकेकडे विचारणा केली असता २०१६ नंतर ज्यांनी वापर परवाना घेतला आहे त्यांना ही वाढीव बिले दिली असल्याचे सांगितले.
फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने ५०० चौरस फुटापर्यंत मालमत्ताकर माफ करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
हा निर्णय कधी मंजूर होणार याकडे आता ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. अन्यथा हा वाढीव कर लादल्यास ठाण्यात उग्र आंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वर्षीचा पालिकेचा अर्थसंकल्प ३ हजार ३९० कोटी ७८ लाख रु पयांचा असून महसुली उत्पन्न २ हजार २३३ कोटींचे अपेक्षित धरले आहे. यामध्ये मालमत्ताकरापासून ४८० कोटी उत्पन्न मिळणार आहे. यंदा पुन्हा पालिकेने मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या विविध लाभ करात वाढ सुचविली आहे. (प्रतिनिधी)