चार अनुभवविश्वांचा हटके मिलाफ ‘चार सख्य चोवीस’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 01:59 AM2019-02-10T01:59:41+5:302019-02-10T02:00:11+5:30
प्रत्येकीचं क्षेत्रं वेगळं, अनुभवविश्व त्याहून वेगळं, पण तरीही जबरदस्त निरीक्षणशक्ती, हाती घेतलेलं काम तडीस नेण्याची जिद्द, या समान धाग्याने त्या चौघी बांधल्या गेल्या त्या एका आगळ्यावेगळ्या निर्मितीसाठी.
- स्नेहा पावसकर
ठाणे : प्रत्येकीचं क्षेत्रं वेगळं, अनुभवविश्व त्याहून वेगळं, पण तरीही जबरदस्त निरीक्षणशक्ती, हाती घेतलेलं काम तडीस नेण्याची जिद्द, या समान धाग्याने त्या चौघी बांधल्या गेल्या त्या एका आगळ्यावेगळ्या निर्मितीसाठी. या चौघींच्या लेखणीतून साकारला गेला तो ‘चार सख्य चोवीस’ हा लघुकथासंग्रह.
अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी, पेशाने व्हॉइस थेरपिस्ट व स्तंभलेखिका डॉ. सोनाली लोहार, सूत्रसंचालन, सामाजिक कार्यातही सहभागी होणाऱ्या हर्षदा बोरकर व मराठीच्या प्राध्यापिका निर्मोही फडके यांनी नव्याने कथा लिहिल्या.
आम्ही चौघी सुखवस्तू व शहरी भागातल्या. पण आम्ही काही पाहतो, अनुभवतो आणि तेच सांगण्याचा प्रयत्न या कथांमधून केल्याचे संपदा जोगळेकर-कुळकर्णी सांगतात.
संग्रहात वेगवेगळ्या जाणिवा वाचकांना अनुभवता येतील, असं डॉ. सोनाली लोहार सांगतात. काही प्रसंगांना, काही भेटलेल्या व्यक्तींना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे, असे हर्षदा बोरकर म्हणतात. मला उलगडलेले मराठी भाषेचे वैशिष्ट्य अधिक स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केल्याचे निर्मोही फडके म्हणाल्या.
२० कथांचा समावेश
संग्रहात चारही जणींच्या प्रत्येकी पाच याप्रमाणे २० कथा आहेत. हा कथासंग्रह ‘ग्रंथाली’ प्रकाशित करत असून मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ अतुल जोशी यांनी केले आहे. प्रस्तावना ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची आहे. कथासंग्रहातील रेखाचित्रे पूजा रायबागी यांनी रेखाटलेली आहेत.
असा झाला प्रवास
ठाणे आर्ट गिल्ड अर्थात ‘टॅग’ या संस्थेने काही वर्षांपूर्वी ग्रंथगंध नावाचा साहित्यविषयक विभाग सुरू केला. डॉ. सोनाली लोहार त्याच्या प्रमुख आहेत. या उपक्र मात जोगळेकर यांनी दिलेल्या चित्राला अनुसरून २० शब्दांची कथा मागवली होती. त्यात लिहिल्या गेलेल्या कथांमध्ये सुमारे ८० टक्के कथा महिलांच्या व २० टक्के कथा पुरुषांच्या असायच्या. ग्रंथगंधची हीच संकल्पना डोक्यात ठेवून आणि समाजभान जपत याच उपक्र मात लिहिणारे काही समकालीन हात संपदा यांनी पकडले आणि त्यांची वाटचाल सुरू झाली, ती ‘चार सख्य चोवीस’च्या दिशेने.