चौघांना ३ फेब्रुवारीपर्यंत कोठडी
By admin | Published: January 26, 2016 03:11 AM2016-01-26T03:11:32+5:302016-01-26T03:11:32+5:30
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ठाणे महापालिकेच्या चार नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत ३ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे
ठाणे : बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ठाणे महापालिकेच्या चार नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत ३ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले होते. त्या वेळी न्यायालयाने हा निर्णय दिला.
ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, मनसेचे सुधाकर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नजीब मुल्ला आणि काँग्रेसचे माजी गटनेते विक्रांत चव्हाण यांनी शरणागती पत्करल्यानंतर, त्यांना सुरुवातीला नऊ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर, तीन वेळा प्रत्येकी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यांना मिळाली. २५ जानेवारीला ही मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा सोमवारी न्यायालयात हजर केले, तेव्हा ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बंबार्डे यांनी त्यांच्या कोठडीत १० दिवसांची वाढ केली. त्यानुसार, पुन्हा त्यांची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या वेळीही चौघांच्याही समर्थकांनी न्यायालयाभोवती आणि न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)