भिवंडीत लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:38 PM2018-04-11T22:38:42+5:302018-04-11T22:38:42+5:30
भिवंडी : तालुक्यातील काल्हेर गावात पृथ्वी कॉम्प्लेक्सच्या गोदाम संकुलात आज बुधवारी दुपारनंतर लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. या आगीत सौंदर्य प्रसाधने व मंडप सजावटीची सामुग्री जळून खाक झाली.
काल्हेर गावात पृथ्वी कॉम्प्लेक्सच्या गोदाम संकुलातील संकुलातील इमारत क्र.ए-५ मधील गाळा क्र. १ व २ मध्ये आज बुधवारी दुपारनंतर लागलेल्या आगीत ४ गोदामे जळून खाक झाली. या गोदामांत मंडपाचे सामान, सजावटीसाठी लागणाऱ्या कापडाच्या झालरी, शोभेच्या विविध फायबर व प्लास्टीकच्या वस्तू तसेच महिलांची सौंदर्य प्रसाधने साठविलेली होती. आग लागल्याचे समजताच भिवंडी,कल्याण,उल्हासनगर,अंबरनाथ व ठाणे मनपाच्या अग्निशामक दलाने धाव घेतली.अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने दोन तासात आग आटोक्यात आली. तर आग शांत करण्यास चार तास लागले. उन्हाच्या तपमानाने सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तूंना आग लागल्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात आला आाहे. तर काहींनी व्यावसायीक वैरभावनेतून आग लावल्याचा अंदाज केला जात आहे. गोदाम क्षेत्रात आग विझविण्याचे साधन सामुग्री नसल्याने ताबडतोब आग विझविली जात नाही. त्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांची वाट पहावी लागते.तोपर्यंत लागलेल्या आगीत आजूबाजूच्या गोदामांचा बळी जात असल्याचे आजवरच्या घटनांमधून दिसून आले आहे. मात्र याबाबत शासन पातळीवरून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.दरम्यान नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी काल्हेरच्या आगीची नोंद जळीत नोंदीच्या रजीस्टरमध्ये केली आहे.