घरफोडी करणारे चार अट्टल चोरटे जेरबंद : दोन लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत
By जितेंद्र कालेकर | Published: February 9, 2023 08:37 PM2023-02-09T20:37:06+5:302023-02-09T20:37:17+5:30
चितळसर पोलिसांची कारवाई : अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी
ठाणे : घरफोडी करून अडीच लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणा?्या सलीम शेख उर्फ संजय कांबळे उर्फ मामा उर्फ कुया (४२, भुसार अळी रोड, ठाणे) आणि इस्माईल खान (रा. मानखुर्द, मुंबई ) यांच्यासह चार अट्टल चोरट्यांना अटक केल्याची माहिती चितळसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांनी गुरुवारी दिली. त्यांच्याकडून दोन लाख दोन हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
ठाण्यातील धर्मवीरनगर, तुळशीधाम येथील रहिवासी सुषमा पांडे या आपल्या घराला लॉक करून २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ५.४० वाजण्याच्या दरम्यान मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात शिरकाव करीत कपाटातील दोन लाख ५२ हजार ४०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. २३ डिसेंबर २०२२ रोजी चितळसर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला.
अगदी दिवसाढवळ्या गजबजलेल्या वस्तीमध्ये आरोपींनी ही धाडसी चोरी करून पलायन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि सहायक पोलिस आयुक्त नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीवरून यातील आरोपींचा शोध घेतला. यातील फुटेजमध्ये सराईत घरफोडी करणारे अटल चोरटे आढळले. त्यातील एक आरोपी अब्दुल पठाण (४१, शिवाजीनगर, मुंबई) हा मुंबईच्या मानखुर्द भागात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अशोक वाघ यांना मिळाली होती.
त्याच आधारे वाघ यांच्या पथकाने यातील आरोपी पठाण याला ताब्यात घेतले. तेव्हा सलीम शेख, इस्माईल सिराज खान आणि बाबू उर्फ कांबा जमालुद्दीन खान यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी सलीम याला ८ फेब्रुवारी २०२२३ रोजी न्यायालयाचे आदेशान्वये वाकोला पोलिसांकडून ताबा घेऊन अटक केल्याचेही गोडे यांनी सांगितले.