हनी ट्रॅप लावून सहा लाख ९० हजारांची खंडणी उकळणाऱ्या महिलेसह चाैघे जेरबंद
By जितेंद्र कालेकर | Published: May 14, 2023 11:04 PM2023-05-14T23:04:26+5:302023-05-14T23:04:34+5:30
चाकूच्या धाकाने व्यावसायिकाला लॉजवर ठेवले डांबून : श्रीनगर पाेलिसांची कारवाई
ठाणे : हनी ट्रॅप लावून ठाण्यातील एका ५५ वर्षीय व्यावसायिकाकडून सहा लाख ९० हजारांची खंडणी उकळणाऱ्या महिलेसह चाैघांना जेरबंद केल्याची माहिती श्रीनगर पाेलिसांनी रविवारी दिली. त्याला या टोळीने भिवंडीतील एका लॉजवर चाकूच्या धाकावर डांबून ठेवले होते. चाैघांनाही १७ मेपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
या व्यावसायिकाने सुमारे सात लाखांची खंडणी दिल्यानंतरही त्याच्या वागळे इस्टेट येथील दुकानात हे टाेळके पुन्हा पैसे घेण्यासाठी येणार असल्याची माहिती श्रीनगर पाेलिसांना मिळाली. त्याचआधारे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक किरण काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक नितीन हांगे, पाेलिस हवालदार चंद्रकांत सकपाळ, पाेलिस नाईक रूपाली वंजारी, नितीन शेळके आणि राकेश पवार आदींच्या पथकाने १३ मे राेजी सकाळी या महिलेसह चाैघांनाही अटक केली.
या व्यावसायिकाने पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०२३ रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १२ मे २०२३ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत हा खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि लुटीचा प्रकार सुरू होता. यातील शीतल लांजेकर (२७, रा. भांडूप, नावात बदल) या महिलेने या व्यावसायिकाला आधी मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर समीर मांजरेकर (रा. भांडूप), आदित्य गुप्ता (रा. किसननगर, वागळे इस्टेट, ठाणे), राहुल यादव (रा. मुलुंड) आणि त्यांचा अन्य एक साथीदार यांच्याशी संगनमत करून शीतलबराेबर अनैतिक संबंध असल्याची भीती दाखवली. नंतर त्याचे अपहरण करून भिवंडीतील मानकोली येथील लॉजवर नेऊन डांबून ठेवले.
त्याची स्कूटरही त्याच्याकडून जबरदस्तीने हिसकावून समाजात बदनामी करण्याची भीती दाखवली. चाकूच्या धाकावर या व्यावसायिकाच्या मोबाइलमधून दीड लाख रुपये ऑनलाइन काढण्यात आले. तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशातून २५ हजार रुपये, एटीएममधून १५ हजार रुपये आणि पाच लाख रुपये अशा सहा लाख ९० हजारांच्या खंडणीसह स्कूटर असा सात लाख १५ हजारांचा मुद्देमाल बळकावला.
सापळा लावून केली अटक
शीतलबराेबर अनैतिक संबंध असल्याचे दाखवून बदनामीची भीती घालून हे टाेळके १३ मे राेजी वागळे इस्टेट येथील या व्यावसायिकाच्या दुकानात खंडणीसाठी आले. त्याचवेळी सापळा लावून पाेलिसांनी या टाेळक्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी खंडणीसह जबरी चाेरीचा गुन्हा दाखल झाला आहे.