सुवर्ण योजनेत गुंतवणूकीचे अमिष दाखवून चार लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:19 PM2019-07-02T22:19:22+5:302019-07-02T22:24:11+5:30
सुवर्ण योजनेनुसार १५ महिने गुंतवणूक केल्यास मुद्दल अधिक व्याज अशी रक्कम परतावा किंवा सोन्याचे दागिने देण्याचे गुंतवणूकदारांना अमिष दाखविले होते. यातील कोणतीच रक्कम परत न केल्यामुळे गुंतवणूकदारांची दखल घेऊन नौपाडा पोलिसांनी संतोष शेलार याला अटक केली.
ठाणे : सुवर्ण योजनेमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून १०० ते १५० गुंतवणूकदारांना चार लाख १७ हजार ५०० रुपयांचा गंडा घालणाऱ्या संतोष शेलार या ठाण्यातील सराफाला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पातलीपाडा येथील त्रिमूर्तीरत्न ज्वेलर्सचा मालक संतोष शेलार (५१) याने आपल्या दुकानामार्फत सोन्याच्या योजनेत गुंतवणुकीची योजना सुरु केली होती. या योजनेनुसार १५ महिने गुंतवणूक केल्यास मुद्दल अधिक व्याज अशी रक्कम परतावा किंवा सोन्याचे दागिने देण्याचे गुंतवणूकदारांना अमिष दाखविले होते. रामचंद्रनगर, वैतीवाडी येथील रहिवाशी असलेल्या प्रिया जाधव यांच्यासह त्याने अनेकांना या योजनेचे प्रलोभन दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१९ या काळात त्याने ही योजना राबविली. प्रिया आणि त्यांचा मुलगा यांच्याकडून प्रति महिना एक हजार रुपये असे १५ महिने ३० हजार रुपये घेतले. मोठ्या विश्वासाने या रकमेची गुंतवणूक करूनही शेलार याने त्यांना सुवर्ण योजनेतील रक्कम किंवा सोन्याचे दागिनेही परत केले नाही. अशाच प्रकारे त्याने सुमारे १०० ते १५० गुंतवणूकदारांनाही गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जाधव यांच्यासह अनेकांनी नौपाडा पोलीस ठाण्यात २७ जून २०१९ रोजी तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अवघ्या काही तासांतच पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांच्या पथकाने अटक केली. त्याने १५ महिन्यांमध्ये १५ हजार रुपये तसेच व्याजाचे तीन हजार असे प्रत्येकी १८ हजार रुपये किंवा त्याच भावातील सोन्याची वस्तू देण्याचे अमिष दाखवूनही ती न देता जाधव यांच्यासह अनेकांची चार लाख १७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. यात आणखी १०० ते १५० जणांची फसवणूक झाल्याचेही समोर आले असून फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. शेलार याने अपहार केलेली रक्कम इतर कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे, तसेच त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.