मौजमजेसाठी स्वत:च्याच घरात चार लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:39 AM2018-06-01T00:39:16+5:302018-06-01T00:39:16+5:30
मौजमजेसाठी आपल्याच घरातील तीन लाख ९८ हजार ७६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या १७ वर्षांच्या मुलासह त्याच्या दोन मित्रांना विष्णूनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.
डोंबिवली : मौजमजेसाठी आपल्याच घरातील तीन लाख ९८ हजार ७६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या १७ वर्षांच्या मुलासह त्याच्या दोन मित्रांना विष्णूनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. कल्याण न्यायालयाने अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. तर, त्याच्या दोन्ही मित्रांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
पश्चिमेतील आनंदनगर परिसरात ५२ वर्षांचे व्यापारी राहतात. त्यांच्या १७ वर्षांच्या मुलाने आशीष गुप्ता (२१) आणि पुरुषोत्तम माळी (१९) या मित्रांच्या मदतीने स्वत:च्याच घरात चोरी केली. या तिघांनी मिळून तीन लाख ९८ हजार ७६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने डिसेंबरमध्ये चोरले होते. घरात चोरी झाल्याची घटना मुलाच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलासह आशीष आणि पुरुषोत्तम यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यादरम्यान तिघांनी मौजमजेसाठी दागिने चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.
दरम्यान, या तिघांनी चोरलेले सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी दिली.