चार मोबाइल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:39 AM2021-05-26T04:39:47+5:302021-05-26T04:39:47+5:30
------------------------------------- चोरट्याने ठोकली धूम कल्याण : एकीकडे सोनसाखळी चोऱ्या सुरू असताना दुसरीकडे ललिता मनमोहनसिंग रावत या ४८ वर्षीय महिलेने ...
-------------------------------------
चोरट्याने ठोकली धूम
कल्याण : एकीकडे सोनसाखळी चोऱ्या सुरू असताना दुसरीकडे ललिता मनमोहनसिंग रावत या ४८ वर्षीय महिलेने गळ्यातील मंगळसूत्र खेचणाऱ्या चोरट्याला प्रतिकार करून त्याचा हात पकडला. या वेळी त्याने चाकूच्या धाकाने स्वत:ची सुटका करून घेत दुचाकीवरून धूम ठोकली. ही घटना पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------------------
दुचाकी चोरीला
कल्याण : उल्हासनगरमध्ये राहणारे आकाश साळवे कामानिमित्त शनिवारी शहाड परिसरात आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी शहाड - मोहने रोड परिसरात पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------------------------------
पैसे आणि मोबाइल चोरीला
कल्याण : पूर्वेकडील पिसवलीगाव परिसरातील रामवाडी, साईकृपा चाळीत राहणारे राहुल ठोंबरे यांचे कुटुंब शनिवारी रात्री घरात झोपले असताना मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने घराच्या दरवाजाची आतली कडी काढून घरात प्रवेश करून घरातील बॅगेतून पैसे आणि मोबाइल चोरी केला. त्याने झोपेत असलेल्या राहुल यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो यशस्वी झाला नाही. या प्रकरणी राहुल यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------------------------
कार चोरीला
डोंबिवली : वाहनचोरीचे सत्र सुरू असताना पेंडसेनगर परिसरातून कार चोरीला गेल्याची घटना शनिवार ते सोमवार या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी कारचालक ॲन्थनी थॉमस यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------------------------------
मोबाइल खेचून पलायन
कल्याण : पश्चिमेकडील प्रेम ऑटो सर्कल परिसरातील बसस्टॉपवर बसची वाट बघत उभ्या असलेल्या निकिता गायकवाड या तरुणीच्या हातातील मोबाइल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी खेचून पोबारा केला. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गायकवाड हिने दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
------------------------------------------
दागिने लंपास
डोंबिवली : पूर्वेकडील मानपाडा रोडवरील माय सिटी परिसरात राहणाऱ्या भानुमती जैन या रविवारी सकाळी साडेसात वाजता मानपाडा ते दिवा रोडवरून जात होत्या. त्या वेळी दोन भामट्यांनी त्यांना अडवून त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्या अंगावरील ७९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
-------------------------------------------
डांबरीकरण
कल्याण : पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या जुन्या पत्रीपुलावरचा रस्ता समपातळीत नसल्याने ओबडधोबड झाला होता. त्या ठिकाणी आता रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी तातडीने काम व्हावे अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर पत्रीपूल ते बैलबाजार चौक या मार्गावरही डांबराचे पॅच मारण्यात आले असून वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
------------------------------------------------