ठाण्यातून चोरी झालेल्या चार मोबाईलची परराज्यात विक्री: पोलिसांनी लावला छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 09:54 PM2018-02-05T21:54:39+5:302018-02-05T22:00:17+5:30
गेल्या सहा महिन्यामध्ये वर्तकनगर भागातून चोरीस गेलेल्या सात मोबाईलचा शोध घेण्यात यश आले असून त्यातील एक मोबाईल तामिळनाडूतील पोलिसाच्या भावाकडून हस्तगत करण्यात आला आहे.
ठाणे : वर्तकनगर भागातून चोरीस गेलेल्या सात वेगवेगळ्या मोबाइलचा छडा लावण्यात ठाणे पोलिसांना यश आले असून त्यातील चार मोबाइल हे परराज्यातून हस्तगत केले आहेत. यातील एक मोबाइल वर्तकनगर पोलिसांनी तक्रारदाराकडे सुपूर्द केला आहे. तामिळनाडूच्या विशेष कृती दलातील पोलीस शिपायाचा भाऊ लक्ष्मण बालाजी (३३) याला अटक केली आहे.
वर्तकनगर येथील एका सहकारी बँकेच्या व्यवस्थापिका मृदुल करंदीकर (५१) यांचा २५ हजारांचा मोबाइल ३ जानेवारी २०१७ रोजी चोरीस गेला होता. काही तांत्रिक माहितीच्या आधारे हा मोबाइल तामिळनाडूतील पोलिसाच्या भावाकडे असल्याची माहिती वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदशनाखाली गायकवाड तसेच पोलीस नाईक संदीप ठाणगे, भूषण गायकवाड आदींच्या पथकाने थेट तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यात जाऊन २४ डिसेंबर २०१७ रोजी लक्ष्मण याच्याकडून मोबाइल हस्तगत केला. त्याला हा मोबाइल एका चोरट्याने अत्यल्प किमतीत विकल्याची कबुली त्याने दिली. एका पोलिसाचा हा नातेवाईक असल्यामुळे त्याचा ताबा मिळवण्यात ठाणे पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, तामिळनाडू न्यायालयाने बालाजीचा ताबा ठाणे पोलिसांना दिला.
अन्य एका प्रकरणात अक्षय शिंदे (रा. डिसूझावाडी, शिवाजीनगर, ठाणे) यांचा १६ आॅक्टोबर २०१७ रोजी ठाण्यातील विवियाना मॉलमधून ३० हजारांचा मोबाइल गहाळ झाला होता. तो मुंबईच्या धारावीतील सुमंतो रॉय यांना एका चोरट्याने अवघ्या आठ हजारांमध्ये विकला होता. रॉय यांच्याकडून हा मोबाइल हस्तगत केला असून तो ५ फेब्रुवारी रोजी निरीक्षक गिरधर यांच्या हस्ते अक्षय यांना सुपूर्द करण्यात आला.
याशिवाय, ज्ञानेश्वर माने (रा. ढवलेनगर) यांचा ३ जुलै २०१७ रोजी लोकमान्यनगर बस डेपो येथून गहाळ झालेला १५ हजारांचा मोबाइल राजस्थानातील भूपेंद्रसिंग कोसवाल यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्यांना एका भामट्याने पाच हजारांमध्ये तो विकला होता. त्यांच्याकडून तो कुरिअरद्वारे पोलिसांनी मागवला. वर्तकनगर पोलीस ठाण्यातील नाईक नारायण घाणेकर यांचाही नऊ हजारांचा मोबाइल आॅक्टोबर २०१७ मध्ये गहाळ झाला होता. तो इंदूर (मध्य प्रदेश) येथील अकील शेख याच्याकडून हस्तगत करण्यात आला. असे सात मोबाइल हस्तगत केल्याची माहिती गिरधर यांनी ‘लोकमत’ला दिली.