सेक्स रॅकेटमधून सुटका करून घेण्यासाठी चार महिन्यांच्या बालकाचे तरुणीकडून अपहरण
By जितेंद्र कालेकर | Published: April 14, 2024 11:29 PM2024-04-14T23:29:10+5:302024-04-14T23:29:28+5:30
भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई : तरुणीच्या आई आणि मावशीलाही दिली हाेती ठार मारण्याची धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आई आणि मावशीला ठार मारण्याची धमकी देत शरीर विक्रयाच्या व्यवसायात अडकविणाऱ्या दलालाच्याच चार महिन्यांच्या मुलाचे १७ वर्षीय बांगलादेशीय मुलीने अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. अपहरण प्रकरणाचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटच्या पथकाने शोध घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा उलगडा झाला. या मुलीला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तिची मावशी आणि आईची दलालाच्या तावडीतून सुटका करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भिवंडी पोलिसांनी रविवारी दिली.
एका बांगलादेशी तरुणीने डोंबिवलीतील मानपाडा भागातून एका चार महिन्यांच्या मुलाचे अपहरण केले आहे. ती तरुणी मुलासह भिवंडीच्या एसटी स्टँड भागात आली आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाला १३ एप्रिल २०२४ रोजी मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धनराज केदार, पोलिस हवालदार अमोल देसाई आणि माया डोंगरे, आदींच्या पथकाने या मुलीला भिवंडी एसटी स्टॅंड भागातून ताब्यात घेतले. तिच्या तावडीतून या मुलाचीही सुखरूप सुटका केली. तरुणी बांगलादेशी असल्याने तिला हिंदी भाषा समजत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी दुभाषीला बोलावून तिने केलेल्या अपहरणाची चाैकशी केली. तेव्हा मुलाच्या वडिलांनी तिला, तिच्या आईला आणि मावशीला गोदामांमध्ये नोकरी देतो, असे सांगून बेकायदा भारतात आणले होते. त्यानंतर त्याने तरुणीला शरीर विक्रयाच्या व्यवसायात ढकलून दिले. हा प्रकार केला नाहीतर तिच्या आईला आणि मावशीला ठार मारण्याची धमकीही तो देत होता. त्याने तरुणीचे अश्लील छायाचित्र आणि चित्रीकरण काढले. ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकीही तो देत होता. या प्रकारापासून सुटका करून घेण्यासाठी तिने त्याच्या बाळाचे अपहरण केल्याची कबुली तपासात पोलिसांना दिली.
भिवंडी युनिटच्या पथकाने तरुणीला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मानपाडा पोलिस पुढील तपास करीत असून, दलालाच्या तावडीतून मुलीच्या आई आणि मावशीची सुटका करण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या दलालाविरुद्ध भारत देशात विना पारपत्र नसताना प्रवेश करणे आणि अनैतिक व्यवसाय करणे, आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.