चार देशी पिस्तुले जप्त

By admin | Published: June 30, 2017 02:43 AM2017-06-30T02:43:20+5:302017-06-30T02:43:20+5:30

डोंबिवलीपासून अंबरनाथ-बदलापूरपर्यंतच्या गुन्हेगारांना शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या उत्तर प्रदेशातील आजमगढ येथील तस्कराच्या मुसक्या

Four native pistols seized | चार देशी पिस्तुले जप्त

चार देशी पिस्तुले जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवलीपासून अंबरनाथ-बदलापूरपर्यंतच्या गुन्हेगारांना शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या उत्तर प्रदेशातील आजमगढ येथील तस्कराच्या मुसक्या आवळण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला बुधवारी यश आले. पोलिसांनी त्याच्याकडून काडतुसांसह चार पिस्तुले हस्तगत केली आहेत. कल्याण न्यायालयाने त्याला ३ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शफिक हाबीब अन्सारी (२२, रा. आमपाडा, भिवंडी) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. कल्याण-शीळ महामार्ग आणि बदलापूर पाइपलाइन रोड जोडणाऱ्या काटईनाक्यावर शस्त्रसाठ्यासह तस्कर येणार असल्याची माहिती कल्याण शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना खबऱ्यांकडून मिळाली होती.
या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, फौजदार पवन ठाकूर, फौजदार नितीन मुधगुन, दत्ताराम भोसले, विलास मालशेटे, राजेंद्र खिलारे आणि अजित राजपूत यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळपासून नाक्यावर सापळा रचला होता. जवळपास तासाभराच्या प्रतीक्षेनंतर एक तरुण तेथे आला. पोलिसांनी त्याला घेराव घातला. अंगझडतीच्या वेळी काही रकमेसह आजमगढ ते कल्याण असे प्रवासाचे तिकीट सापडले. पाठीवरील बॅगची झडती घेतली असता कापडी पिशवीत निळ्या रंगाच्या जीन्स पॅण्टमध्ये गुंडाळून ठेवलेली चार देशी बनावटीची पिस्तुले आणि प्लास्टिकच्या पिशवीत चार जिवंत काडतुसे आढळली. या सर्व शस्त्रांची किंमत बाजारपेठेत ६० हजार ८१० रुपये आहे.
याप्रकरणी हवालदार भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात अन्सारीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, डोंबिवलीत मे महिन्यात विविध गोळीबारांच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी केलेली कारवाई मोठी मानली जात आहे.

Web Title: Four native pistols seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.