चार रात्री फक्त पाणी अन् काळोख, मलेशियात अपहरण झालेल्या वैद्यबंधूंनी सांगितली आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 02:57 AM2018-08-12T02:57:49+5:302018-08-12T02:58:46+5:30
‘व्यवसायानिमित्त मलेशियात गेलो असताना अपहरणकर्त्यांनी आमचे अपहरण करत आम्हाला एका बंद खोलीत डांबून ठेवले. डोळ्यांना व हातापायांना त्यांनी पट्टी बांधली होती. त्यांना आठवण आली तरच...
डोंबिवली : ‘व्यवसायानिमित्त मलेशियात गेलो असताना अपहरणकर्त्यांनी आमचे अपहरण करत आम्हाला एका बंद खोलीत डांबून ठेवले. डोळ्यांना व हातापायांना त्यांनी पट्टी बांधली होती. त्यांना आठवण आली तरच ते आम्हाला जेवायला देत होते, अशा बिकट अवस्थेत आम्ही चार रात्री अपहरणकर्त्यांच्या तावडीत होतो. आमची सहीसलामत सुटका होईल, असे आम्हाला वाटले नव्हते; पण आज कुटुंबीयांसोबत असल्याने आम्ही खूश आहोत’ अशा शब्दांत वैद्यबंधूंनी तेथील प्रकार कथन केला.
मलेशियामध्ये अपहरण झालेले वैद्यबंधू शुक्रवारी डोंबिवलीतील घरी परतले. त्यानंतर, शनिवारी त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ‘रॉक फ्रोझन फूड’ नावाने फ्रोझन फिशविक्रीचा व्यवसाय कौस्तुभ आणि रोहन वैद्य करतात. या व्यवसायानिमित्त रोहन नेहमी परदेशात जातो. मलेशियातील मीस ली फ्रोझन फूड कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत व्यावसायिक चर्चेसाठी रोहन मलेशियामध्ये जाणार होता. याचदरम्यान, लॅक-किन मरिन कंपनीच्या एका माणसाने त्यांना फोन करून व्यवसायाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली, तसेच व्यवसाय करायचा असल्याचे त्यांना सांगितले. त्यावर, मलेशियात आल्यावर भेटून सविस्तर चर्चा करू, असे रोहन आणि कौस्तुभ यांनी त्यांना सांगितले.
२ आॅगस्टला मलेशियातील मीस ली फ्रोझन फूड कंपनीच्या अधिकाºयांसोबत वैद्यबंधूंची व्यावसायिक चर्चा संपली. त्यानंतर, ते लॅक-किन मरिन कंपनी चालवणाºया अली नावाच्या व्यक्तीला भेटणार होते. या कंपनीच्या माणसाने वैद्यबंधंूना घेण्यासाठी हॉटेलमध्ये एक मोटार पाठवली; परंतु तेथे जात असताना रस्त्यातच एके ठिकाणी अन्य मोटारीतून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्यांना मारहाण करत त्यांच्याजवळील पाकीट, सोन्याचे दागिने तसेच मोबाइल काढून घेतले. त्यांचे हातपाय, डोळे पट्टीने बांधले. त्यामुळे नेमके कुठे नेले, हे वैद्यबंधंूना कळले नाही. चार दिवस या दोघांना कोंडून ठेवले होते.
अपहरणकर्ते हे आपापसात तामीळमध्ये बोलत होते, तर आमच्याशी इंग्रजीत संभाषण करत होते. अपहरणकर्त्यांनी आमच्याकडे एक कोटीची मागणी केली; परंतु पैसे न दिल्यास कौस्तुभला मारण्याची धमकीही त्यांनी दिली. काळोख असल्याने त्यांच्याकडे नेमकी कोणती शस्त्रे होती, हे आम्हाला समजू शकले नाही, असे त्यांनी सांगितले. अपहरणकर्त्यांनी परत मलेशियासह इतर तीन देशांत पुन्हा यायचे नाही, अशी धमकी देऊन आम्हाला सोडून दिले, असे वैद्यबंधू म्हणाले. या प्रकरणी पुढील तपास मलेशिया पोलीस तसेच ठाणे पोलीस करत आहेत.
भारतीय टॅक्सीचालकाने सोडले
अपहरणकर्त्यांनी या दोघांकडील मोबाइल, पाकीट, सोन्याच्या वस्तू घेतल्या होत्या. चार रात्री आणि पाच दिवसांनंतर रात्री ११ च्या सुमारास सिंगापूरच्या दिशेला असलेल्या जोहरबारू रोड महामार्गावर अपहरणकर्त्यांनी वैद्यबंधूंना सोडले. तेथे त्यांनी एका टॅक्सीला हात दाखवला. टॅक्सीचालकाला वैद्यबंधूंनी आपल्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला. तो भारतीय होता. त्याने दोघांना त्यांचे वास्तव्य असलेल्या ग्रॅण्ड आर्चेड हॉटेलवर आणून सोडले. यानंतर, मलेशियन पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली.
रोहन हा व्यवसायाच्या निमित्ताने नेहमी मलेशियात ये-जा करत होता; परंतु लॅक-किन मरिन ही नवीन कंपनी आपल्यासोबत व्यवसाय करण्यास उत्सुक असल्याने कौस्तुभ पहिल्यांदा मलेशियात रोहनसोबत गेला.