मुद्रांक खाडाखोडप्रकरणी चार पदाधिकाऱ्यांना अटक
By admin | Published: December 28, 2015 02:28 AM2015-12-28T02:28:39+5:302015-12-28T02:28:39+5:30
एम-२० फॉर्म भरण्याकरिता २०११ साली खरेदी केलेल्या गैर न्यायिक मुद्रांक पेपरवर खाडाखोड करून ते २००८ सालचे भासवल्याप्रकरणी भार्इंदरच्या एका गृहनिर्माण संस्थेच्या
मीरा रोड : एम-२० फॉर्म भरण्याकरिता २०११ साली खरेदी केलेल्या गैर न्यायिक मुद्रांक पेपरवर खाडाखोड करून ते २००८ सालचे भासवल्याप्रकरणी भार्इंदरच्या एका गृहनिर्माण संस्थेच्या चौघा पदाधिकाऱ्यांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. एका महिला पदाधिकाऱ्याचा शोध सुरू असून सदर मुद्रांक पेपर नोटरी व साक्षांकित करणारा वकील व एक तत्कालीन नगरसेविका अडचणीत येण्याची शक्यता आहे. माहिती अधिकारात संस्थेच्याच रहिवाशाने हा प्रकार उघड केला.
भार्इंदर पश्चिमेस जनतानगर मार्गावर (शिवसेना गल्ली) संगम नावाची गृहनिर्माण संस्था आहे. बिल्डिंग क्र . १ मध्ये राहणारे किशनकुमार डागा (५७) यांना मार्च २०११ मध्ये संस्थेच्या कार्यकारिणीने मुद्रांक पेपर खरेदीसाठी तब्बल २३ हजार रु पये खर्च दाखवून तेवढी रक्कम घेतल्याचे समजले. संशय आल्याने डागा यांनी माहिती अधिकारात ठाणे उपनिबंधक कार्यालयाकडून कमिटीने सादर केलेले एम-२० च्या मुद्रांक पेपरवरील अर्ज मिळवले. त्यावर, ४ आॅगस्ट २००८ अशा तारखा नमूद होत्या. तारखांची खाडाखोड दिसल्याने डागा यांनी मुंबईच्या मुद्रांक कार्यालयाकडे त्याची माहिती मागवली असता ते जानेवारी व फेब्रुवारी २०११ मध्ये वितरीत झाल्याचे उघड झाले. मुद्रांक पेपरवर फेरफार करून बनावट दस्तावेज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी भार्इंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो ठाणेनगर पोलीस ठाण्यास वर्ग केला होता. २१ नोव्हेंबर २०१५ रोजी ठाणेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष उमेश शाह, सचिव रमेश पटेल, खजिनदार दिनेश मिस्त्री व सभासद हितेशभाई शाह या चौघांना १९ डिसेंबर रोजी अटक केली. आज मंगळवारी आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. (प्रतिनिधी)