अधिकाऱ्याचे पिस्टल चोरणा-या चौघांना अटक, खंडणीसाठी केली होती चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:20 AM2020-01-07T00:20:51+5:302020-01-07T00:20:57+5:30
महेंद्र दुधनव (२३) या सराईत चोराने साथीदारांच्या मदतीने कापूरबावडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळू वंजारे यांचे शासकीय पिस्टल शनिवारी रात्री चोरले होते.
ठाणे : आता चोरी करणे सोडले असून मला नोकरीला लावा. मी ती चांगल्या प्रकारे करेन, असा दावा करणा-या महेंद्र दुधनव (२३) या सराईत चोराने साथीदारांच्या मदतीने कापूरबावडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळू वंजारे यांचे शासकीय पिस्टल शनिवारी रात्री चोरले होते. महेंद्र याच्यासह चौघांनाही रविवारी कापूरबावडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पिस्टलही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वंजारे यांना ३ जानेवारी रोजी ठाणे पोलीस मुख्यालय येथे स्ट्राँग कैदी पार्टीची ड्युटी दिली होती. त्यांची ड्युटी ठाणे मध्यवर्ती कारागृह याठिकाणी असल्यामुळे ते मोटारसायकलने त्याठिकाणी गेले. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर ठाणे कारागृह येथून ते साध्या गणवेशात पोलीस ठाण्याकडे निघाले. त्यावेळी मोटारसायकलच्या डिक्कीमध्येच त्यांनी गणवेश आणि रिव्हॉल्व्हर ठेवले होते. कामकाज संपल्यानंतर मोटारसायकल पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये उभी करून ते कल्याण येथील घरी गेले. ४ जानेवारी रोजी सकाळी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ते आले. त्यावेळी डिक्कीमधील गणवेश त्यांनी काढला. मात्र, त्यांचे शासकीय पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे चोरीस गेल्याचे आढळले. डिक्कीचे लॉक बनावट चावीने उघडून या पिस्टलची चोरी झाल्याचे आढळले. याप्रकरणी त्यांनी तातडीने आपल्याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ, राजेंद्र तोरडमल, पोलीस हवालदार राजू मोरे आणि संतोष गुरव आदींच्या पथकाने अवघ्या काही तासांमध्येच माजिवडा परिसरातून महेंद्र दुधनव (२३), भीमराज मलिंगे (१९) आणि त्यांचे अन्य दोन अल्पवयीन साथीदार अशा चौघांना ताब्यात घेतले. महेंद्र आणि भीमराज यांच्याविरुद्ध यापूर्वीही चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी उकळण्यासाठी तसेच जबरी चोरीसाठी त्यांना पिस्टलची गरज होती. यातूनच हे कृत्य केल्याची कबुली त्यांनी दिली.
>नोकरीसाठी
केली होती याचना
महेंद्रसह चौघेही आरोपी हे माजिवडा भागातील साईनाथनगर येथील रहिवासी आहेत. महेंद्र याला एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात कापूरबावडी पोलिसांनी महिनाभरापूर्वी अटक केली होती.
त्यानंतर, त्याने आपण आता चोरी करणे सोडल्याचा दावा करीत सहायक पोलीस निरीक्षक वंजारे यांच्याकडे नोकरीसाठी काही दिवसांपूर्वी याचना केली होती. त्यासाठी तो त्यांच्याकडे वारंवार फेºया मारीत होता.
कालांतराने त्याने त्यांनाच लक्ष्य करीत त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून पिस्टल चोरण्याचे धाडस केले. सुदैवाने पोलिसांच्या अन्य एका पथकाने या पिस्टलचा तपास लावल्याने संभाव्य अनर्थ टळल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होती.